निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही ज्या वेगाने वर जातात, त्याच वेगाने खाली येतात. त्यामुळे तुमचा वेग काय आहे, हे महत्वाचे असते. तुमचा वेग जर नैतिकेच्य
निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही ज्या वेगाने वर जातात, त्याच वेगाने खाली येतात. त्यामुळे तुमचा वेग काय आहे, हे महत्वाचे असते. तुमचा वेग जर नैतिकेच्या पायावर भक्कम असेल, तर तुम्ही टिकून राहतात. गेल्या काही वर्षांपासून अदानी समूहाची आर्थिक प्रगती वेगाने होतांना दिसून येत आहे. देशातील सर्वाधिक विमानतळे, सर्वाधिक सार्वजनिक असणार्या कंपन्या खरेदी करण्यात अदानी समूहाचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. मात्र यानिमित्ताने मोदी सरकारवर देखील प्रचंड टीका झाली. कारण मोदी सरकार आणि अदानी यांचे गुजरात कनेक्शन असल्याचा दावा काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर खळबळ उडाली होती. संसदेत राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांचा एकत्र फोटो लोकसभेत झळकावत, यांचे नाते काय असा सवाल केला होता. त्यानंतर राहुल गांधी यांच्याभोवतीचा फास आवळण्यात आला, त्यांना झालेली शिक्षा, त्यांनतर त्यांचे संसदेतील खासदारकी संपुष्टात आली होती. मात्र राहुल गांधी यांच्या आरोपापूर्वी जानेवारीमध्ये ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अदानी समूहावर कथित लबाडी आणि गैरप्रकाराचे आरोप केले होते. त्यामुळे समूहातील कंपन्यांच्या बाजारमूल्यास जबर फटका बसला होता. हा घाव ताजा असताना, जवळपास त्याच आरोपांना नव्याने पुष्टी देणारे दस्तावेज ‘ओसीसीआरपी’ने पटलावर आणले आहेत.या अहवालातून अनेक बाबी स्पष्ट झाल्यानंतर अदानी समूहाचे शेअर कोसळले होते. कंपनीचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर अदानी समूह सावरत असतांना पुन्हा एकदा अदानी समूहावर नवे संकट घोंघावतांना दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अदानी समूहाचे प्रवर्तक कुटुंबीय आणि भागीदारांशी संलग्न परदेशी संस्थांद्वारे कोट्यवधी डॉलरची गुंतवणूक स्वत:च्याच कंपन्यांच्या समभागांचे भाव फुगवण्यासाठी कथितपणे करण्यात आली, असा आरोप शोधपत्रकारांची जागतिक संघटना असलेल्या ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी)’ ने केला. या आरोपानंतर भारताता एकच खळबळ उडाली असून, अदानी समूहाचे शेअर्स कोसळायला सुरूवात झाली आहे. खरं पाहिले तर अदानी समूहाने आगपाखड करतांना म्हटले आहे की, आमच्यावर विदेशी मीडियाने ट्रायल सुरू असल्याचे म्हटले आहे. मात्र या अहवालामुळे समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये दणकून विक्री आणि अदानींच्या एकत्रित बाजारमूल्याला तब्बल 36 हजार कोटींचे नुकसान सोसावे लागले. जगभरात करमुक्त छावण्या म्हणून प्रसिद्ध असणार्या मॉरिसशसारख्या देशांतील अनेक दस्तावेज आणि अदानी समूहातील अंतर्गत ई-मेल संदेश आणि फायलींच्या आधारे ‘ओसीसीआरपी’ने हे आरोप केले आहेत. यानुसार, दोन वैयक्तिक गुंतवणूकदार-दुबईचे नासेर अली शाबान अली आणि तैवानचे चांग चुंग-लिंग यांचे अदानी कुटुंबाशी दीर्घकाळ व्यावसायिक संबंध असून, अदानी कुटुंबाने त्यांचा आणि याच प्रकारच्या विदेशस्थ प्रारूपाचा समूहातील कंपन्यांचे समभाग खरेदी आणि विक्रीसाठी आधीपासूनच वापर केला असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अदानी समूहाची लबाडी जगासमोर येतांना दिसून येत आहे. तसेच या अहवालानुसार विनोद अदानी यांच्याशी निगडित कंपन्यांमध्येही अली आणि चँग हे दोघे सक्रिय होते. त्यांनी परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांची खरेदी-विक्री केली. अदानी कुटुंबाच्या सहयोगींनी गौतम अदानी यांना भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली व्यवसायांपैकी एक बनविण्यासाठी स्वत:च्याच कंपन्यांमधील समभाग अनेक वर्षे विकत घेण्याचे व्यवहार केले आहेत. अली आणि चँग या दोघांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणार्या कंपनीने विनोद अदानी यांच्या कंपनीलाही गुंतवणूक सल्ल्यासाठी पैसे दिल्याचे कागदपत्रेही समोर आली आहेत. त्यामुळे या कथित लबाडीच्या गुंतवणूक व्यवहारामुळे 2022 साली संस्थापक गौतम अदानी हे 120 अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते, त्यामुळे या दोन्ही अहवालानुसार अदानी समूहाची लबाडी जगासमोर येतांना दिसून येत आहे. त्यामुळे अदानी समूहाचे व्यवहार आता संशयाच्या भोवर्यात सापडतांना दिसून येत आहे.
COMMENTS