मुंबई : मुंबईकरांची रेल्वेनंतर दुसरी लाईफलाईन म्हणजे बेस्ट होय. याच बेस्ट बसमधील मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकाने सोमवारी रात्री 30-40 वाहनां
मुंबई : मुंबईकरांची रेल्वेनंतर दुसरी लाईफलाईन म्हणजे बेस्ट होय. याच बेस्ट बसमधील मद्यधुंद अवस्थेत असलेल्या बस चालकाने सोमवारी रात्री 30-40 वाहनांना चिरडले, या अपघातात तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 50 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय मोरे याला अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने आरोपीला 11 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात संजय मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नव्हता अशी देखील माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
कुर्ल्यातील लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावरील आंबेडकरनगर भागात ‘बेस्ट’ शहर वाहतूक सेवेच्या बसने अनेक वाहनांना चिरडले. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस इलेक्ट्रिक वाहन होते. कुर्ला स्टेशनहून येणार्या या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. अर्पण हॉस्पिटलजवळ त्याचे नियंत्रण सुटले व सुमारे 500 मीटरपर्यंत त्याने रस्त्यावरील 30 ते 40 वाहनांना ठोकरले. यात पाच ते सहा ऑटो रिक्षांचा चक्काचूर झाला. आरोपी चालक संजय मोरे सोमवारी पहिल्यांदाच ही बस चालवत होता, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी तो मिनी बस चालवत होता अशी माहिती आहे. 1 डिसेंबर रोजीच ते बेस्टमध्ये कंत्राटी चालक म्हणून रुजू झाला होता. त्याने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे समजते आहे. त्यामुळेच हा अपघात झाला. शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे म्हणाले की, कुर्ला स्थानकातून निघालेल्या बसचे ब्रेक निकामी झाले आणि चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. चालक घाबरला आणि ब्रेक दाबण्याऐवजी त्याने एक्सलेटर दाबला, त्यामुळे बसचा वेग वाढला. अचानक अनियंत्रित झाल्याने क्षणार्धात काय झाले हे चालकालाही कळले नाही. एका कोपर्यात जाऊन बस धडकल्यानंतर जमावाने त्याला खाली ओढले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून चालकाला ताब्यात घेतले. तो खरेच दारू प्यालेला होता का, याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. मनपाच्या अधिकार्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवान मदतीला धावून आले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, या मार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ असताना अचानक अनियंत्रित झालेली बस बाजारपेठेत घुसली. दिसेल त्या वाहनाला तिने चिरडले. त्यामुळे सर्वजण भयभीत झाले. सुमारे 500 मीटरपर्यंत ही बस गाड्या चिरडत होती, नंतर एका कोपर्यात जाऊन धडकली. परिसरातील लोकांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र बचावकार्यासाठी एक तासाने रुग्णवाहिका आली. तोपर्यंत नागरिकांनी आपापल्या वाहनांनी जखमींना रुग्णालयात नेले होते. या तातडीच्या मदतीमुळे अनेकांचे जीव वाचल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
चालकाला फक्त 10 दिवस वाहन चालवायचा अनुभव
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील चालक संजय मोरे याला मोठे वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याची माहिती समोर आली आहे. मोरे हा बेस्टमध्ये 1 डिसेंबर रोजी चालक म्हणून भरती झाला होता. यापूर्वी तो दुसर्या ठिकाणी कामाला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याला, या पूर्वी त्याने कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्याला वाहन चालवण्याचा अनुभव नसताना मोठी बस चालवायला कुणी दिली? असा सवाल उपस्थित होत आहे. संजय मोरे याने अपघातग्रस्त इलेक्ट्रीक बस त्याने 10 दिवसांपूर्वी चालवयला सुरवात केली होती. ही बस कशी चालवायची याचे ट्रेनिंग देखील त्याला नव्हते.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत :मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
COMMENTS