Homeताज्या बातम्यासंपादकीय

आत्मक्लेष देणारे उपोषण सोडा; व्यवस्थेविरुद्ध लढूया !

ओबीसींच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले प्रा. लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीत घसरण होत असल्याने, राज्य सरकारने ताबडतोब दखल घ्यावी. ओबीसींचे उपो

रूग्णांचा नव्हे, नागरिकांचा डेटा सेल! 
प्रा. हाके यांच्यावर झुंडशाहीचा हल्ला गंभीर!
शेअर मार्केट का गडगडतेय ! 

ओबीसींच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले प्रा. लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीत घसरण होत असल्याने, राज्य सरकारने ताबडतोब दखल घ्यावी. ओबीसींचे उपोषण म्हणून उपोषणकर्त्यांचे नेमकं म्हणणं काय, ती भूमिका शासनाने जाणून घेतली पाहिजे. परंतु, शासन मात्र त्या संदर्भात विचार करायला तयार नाही. याचा अर्थ, ओबीसी समुदायाशी शासनाचे संबंध हे एक प्रकारे फसवणूक करण्याच्या उद्देशाचे आहेत का, ही बाब देखील स्पष्ट व्हायला हवी. मराठा-कुणबी या नोंदी फ्राॅड आहेत असा आरोप प्रा. लक्ष्मण हक्क यांनी थेट केला आहे. त्या संदर्भात एकूण ५७ लाख मराठा कुटुंबांना कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप, छगन भुजबळ यांनीही केला. मनोज जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेतून भुजबळांना टार्गेट करीत असले तरी, त्यांचा मुख्य उद्देश  धनगरांना उध्वस्त करण्याचा आहे, असा आरोपही प्रा. हाके यांनी केला आहे. आमच्या मते केवळ जात आणि समूहांनी त्याचबरोबर प्रवर्गांनी आपसात लढण्यापेक्षा, आपल्या सगळ्यांच्याच लढाया किंवा संघर्ष या व्यवस्थेच्या विरुद्ध आहे. व्यवस्थेचे प्रतिनिधित्व शासन करते. आपल्या कोणत्याही मागण्या ह्या जनतेच्या मागण्या आहेत आणि त्याकडे व्यवस्था आणि पर्यायाने शासन दुर्लक्ष करू शकत नाही. परंतु, गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रवर्ग किंवा जात समूह हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आधी हे वातावरण आपण निवळायला हवं. आपल्याला आपसात लढायला लावून सत्ताधारी जातवर्ग हा एक प्रकारे आपल्यावर अन्याय करतो आहे. या अन्यायाच्या विरुद्ध आपण जे जे आंदोलन करणार, त्या आंदोलनाची दिशा,  सामाजिक प्रवर्गांच्या म्हणजेच एकमेकांच्या विरोधात असते, ही बाब भूषणावह नक्कीच नाही. त्यामुळे आता आपल्याला कोणत्याही आंदोलनाचा विषय ठरवताना आणि त्यावर आंदोलन करताना ते थेट व्यवस्था, म्हणजे शासनाच्या धोरणाविरुद्ध आहे, हे जाहीरपणे म्हटले पाहिजे. मनोज जरांगे पाटील हे काही सत्ताधारी नाहीत. ते धनगरांना उध्वस्त कसे करू शकतात? त्याऐवजी मराठा आणि ओबीसी आपण आपसात भांडत असताना एकंदरीत व्यवस्था मात्र या सगळ्यांची मजा घेत आहे; असंच दृश्य महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला दिसत आहे.

ओबीसी आरक्षणासाठी आपला सामूहिक लढा असो अथवा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील यांचा लढा असो, हे दोन्ही लढे खरे तर व्यवस्थेच्या विरोधात आहेत. परंतु, आपण प्रवर्ग किंवा समुदाय म्हणून चुका करीत आहोत आणि एकमेकांच्या विरोधात संघर्ष करीत बसलो आहोत. यात मात्र व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारी शासन संस्था, हे आपल्याला झुंजवत आहे. त्यामुळे आपण एकमेकांच्या विरोधात न लढता आता आरक्षणाचे लढे हे शासनाच्या म्हणजेच व्यवस्थेच्या विरोधात लढावे लागतील. कारण, व्यवस्था ही आपल्याला आपसामध्ये झुंजवत आहे. त्यामुळे आम्ही ही ठोस भूमिका घेतो की, ओबीसी आंदोलनकर्ते आणि उपोषणकर्ते यांनीही व्यवस्थेच्या विरोधात थेट बोलावं. आपसातल्या सामाजिक प्रवर्गांच्या विरोधात आपण जर बोलत राहिलो, तर, त्याचा अर्थ आपण शासनाचं नेमकं प्रतिनिधित्व करतो का, असा संशय कुणाच्याही मनात बळाऊ शकते. त्यामुळे आपली भूमिका आता व्यवस्था म्हणजे शासन संस्थेच्या भूमिके विरोधातच ठरवले गेली पाहिजे.  त्यासाठी आता आपला लढा लोकशाही मार्गाने द्यायला हवा. आमरण उपोषणासारखं हत्यार हे अराजकतेचे व्याकरण आहे. त्यामुळे आत्मक्लेष करणं हा आपला  ओबीसींचा इतिहास नाही. आपण निर्माणकर्ते आहोत. कारागीर समाज आहोत. शेतकरी समाज आहोत. त्यामुळे आपला इतिहास निर्माण करण्याचा आहे. आत्मक्लेषातून आपल्याला संपवण्याचे धोरण आपण घेऊ नये. त्यामुळे प्रा. लक्ष्मण हाके यांना आमची विनंती राहील की, त्यांनी आधी हे उपोषण थांबवावं आणि आपण सर्व ओबीसी व्यवस्थेच्या विरोधात ओबीसींना जे झुंजवत आहेत, त्यावरच थेट लढा देऊया. म्हणजे व्यवस्थेला देखील एक प्रकारे चपराक बसेल. अन्यथा, आपल्याला आपसात लढवून व्यवस्था ही गंमत बघत राहील, यापलीकडे दुसरे काहीही होणार नाही!

COMMENTS