Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अगस्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मरणिका होणार प्रकाशित

प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांची माहिती

अकोले ः तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीला विलक्षण वळण प्राप्त करुन देणारे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञा

अधिकारी नव्हे लोकशाहीचा नोकर होऊन काम करेल- विनायक नरवडे
पाणबुडी मोटार चोरी करणारे जेरबंद
संगमनेरात एसटी संपाला हिंसक वळण ; अज्ञाताकडून एसटीवर दगडफेक; एक महिला जखमी

अकोले ः तालुक्यातील शैक्षणिक क्रांतीला विलक्षण वळण प्राप्त करुन देणारे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणार असून या निमित्ताने संस्मरणीय स्मरणिका प्रकाशित होणार आहे अशी माहिती अगस्ति महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी दिली.
माजी विद्यार्थ्यांसह संस्थेशी संबंधित शिक्षणप्रेमी तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांनी संस्थेविषयी आठवणींसह अनुभवाचा मागोवा घेणार्या आठवणी संस्था कार्यालयाकडे लवकरात लवकर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. 1 जुलै 1974 ला महाविद्यालयाचे शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक पदार्पण झाले होते. ऐन दुष्काळात तत्कालीन परिस्थितीत शैक्षणिक संस्था, महाविद्यालये सुरु करण्यासाठी धोरण नसताना अकोले महाविद्यालय स्थापनेस अनुमती मिळाली होती. माजी मंत्री दादासाहेब रुपवते, लालचंदजी शहा, यशवंतराव भांगरे, बुवासाहेब नवले, भाऊसाहेब हांडे, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यासह अन्य मान्यवरांनी प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करुन तालुक्यात मोलाचा शैक्षणिक प्रयोग यशस्वी केला होता. 1974 च्या दुष्काळी परिस्थितीत नविन महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी देण्याचे शासनाचे धोरण नसताना विशेष बाब म्हणून मान्यता मिळाली आणि वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित असणार्या तालुक्यातील आदिवासी, मागासवर्गीय, गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडली. महाविद्यालय स्थिरस्थावर झाल्यानंतर संस्थेने आपला शैक्षणिक विस्तार केला. महाविद्यालयात प्रथम कला व वाणिज्य शाखेस मान्यता मिळालेली होती. नंतर विज्ञान शाखा व पदव्युत्तर वर्ग सुरु केले. त्यानंतर संस्थेचा तालुक्यात 10 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, एम.बी.ए, एम. सी.ए., पॉलिटेक्निक महाविद्यालय, आयटीआय, परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल सुरु केले. तसेच शेंडी, समशेरपूर व कोतुळ येथे विनाअनुदानित महाविद्यालये संस्थेने सुरु केली.

स्थापनेपासून अकोले महाविद्यालयात विद्यार्थी हितासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृहात मोफत प्रवेश दिला जात आहे. महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील अन्नधान्य, किराणा दान व संकलन योजना राबविली जात आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यात योगदान देत आहेत. प्रामुख्याने विद्यार्थी वर्गाचे योगदान अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकजण 1 किलो तांदूळ, 1 किलो गहू संकलन करुन सहकार्य करतात.  महाविद्यालयाने शैक्षणिक व भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासास प्राधान्य दिले असून संशोधनाची संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तालुक्यातील विद्यार्थी मागे राहू नयेत म्हणून बीबीए, बीसीए व बीसीएस या संगणकीय पदवी शाखा सुरु केल्या. नुकतीच गुणात्मकदृष्ट्या पडताळणी करुन महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यांकन व प्रमाणन परिषदेने मानांकन बहाल केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व महाविद्यालयात सामंजस्य करार करण्यात आला असून महाविद्यालयात आपले सरकार सेवा केंद्र (सेतू) स्थापित करणेस मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे विविध दाखले विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच उपलब्ध होणार आहेत. या महाविद्यालयाची भरभराट सातत्याने होत असून 1974 साली लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात एक नामांकीत महाविद्यालय म्हणून महाविद्यालयाने एक लौकीक प्राप्त केला आहे. आज पाच हजार पेक्षा अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. अतिशय तळमळीने, निष्ठेने काम करणारे प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयास लाभले आहेत. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहचले आहेत. विद्यार्थ्यांना नोकर्या उपलब्ध करुन देण्यासाठी महाविद्यालय कॅम्पस इंटरव्हयूचे आयोजन करते. वृक्षारोपण, रक्तदान शिबीरे, राष्ट्रीय सेवा योजनेची शिबीरे, पुस्तक प्रदर्शन, विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, व्याख्याने असे उपक्रम महाविद्यालयात सातत्याने राबविले जात आहेत. नवीन इमारतीसह, विस्तारित सभागृह. संस्थेतील भूतपूर्व ज्येष्ठ पदाधिकारी, माजी स्वीकृत विश्‍वस्त आदिंचा गौरव असे विविध भव्य उपक्रम राबविले जातील. या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची बैठक पार पडली. माजी विद्यार्थी संघ पदाधिकारी व सर्व सदस्य हेही महाविद्यालाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने विविध उपक्रम राबविणार आहेत. अशी माहिती प्राचार्य डॉ शेळके यांनी दिली. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या औचित्याने प्रकाशित होत असलेल्या स्मरणिकेची योजना, निर्मिती खर्च तसेच वितरण व्यवस्था हे कार्य आर्थिक घटकाशी निगडीत असल्याने कमीत कमी रु. 1000 अथवा ऐच्छिक अधिक रक्कमेचा धनादेश अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी, अकोले नावे संस्था कार्यालयाकडे पाठविण्याचे आवाहन शिक्षणप्रेमी तसेच माजी विद्यार्थ्यांना करावे संस्था कार्यकारी विश्‍वस्त,कायम विश्‍वस्त ,पदाधिकारी, कार्यकारिणी  सदस्य ,माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने प्राचार्य डॉ. शेळके यांनी केले आहे.

COMMENTS