संघर्षाची नवी नांदी !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

संघर्षाची नवी नांदी !

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून अधिकार क्षेञ्त्राच्या वटवृक्षाखाली गर्दीचे मोहळ दाटण्याची प्रथा जुनी आहे. माञ अधिकार प्राप्तीला पोहचण्यासाठी कष्ट उ

कोणता झेंडा घेऊ हाती ?
सत्ता संघर्षाचा पेच आज सुटणार का ?
विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून अधिकार क्षेञ्त्राच्या वटवृक्षाखाली गर्दीचे मोहळ दाटण्याची प्रथा जुनी आहे. माञ अधिकार प्राप्तीला पोहचण्यासाठी कष्ट उपसणार्‍यांचे श्रम जर अधिकारी मंडळींनी दुर्लक्षित केले तर वटवृक्षाच्या सावलीत राहूनही वाढ खुरटण्याची शक्यता बळावते. यालाच आपल्या कृषी भाषेत वसवा असे म्हटले जाते. सध्याच्या राजकारणात असा वसवा निष्ठावंतांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहू लागला असे म्हटले तर वावगे ठरू नये. रानावनात हिंडतांना अनेक खुरटी झाड जगण्याचा संघर्ष करतांना दिसतात, तशी एखाद्या मोठ्या झाडाचा आधार घेऊन वेल पसरणारे बांडगुळही दिसतात. राजकारणाच्या रानातही या दोन जाती हमखास पहायला मिळतात. खुरटी वाढ असलेले निष्ठावान म्हणविणारे सत्तेच्या दाबाखाली एव्हढे चेपले जातात की त्यांना सत्तेच्या स्पर्धेत कुठेच स्थान दिसत नाही. केवळ निष्ठा आहे म्हणून वाढ खुटली तरी झाडाची सावली ते सोडत नाहीत. दुसर्‍या बाजूला असतात ती बांडगुळ. कधीतरी संधी मिळेल तेंव्हा मोठे भरगच्च लगडलेले, पोसलेले झाड पाहून वाढणार्‍या या वेल वर्गीय वनस्पती प्रमाणे राजकारणातील ही बांडगुळ सत्तेत असलेल्या अधिकारप्राप्त नेत्याचा आधार मिळवून सारी राजकीय सुख उपभोगतांना दिसतात. खुरट्या झुडपांचे पीक जसे अमाप येते, कितीही प्रतिकुल परिस्थिती आली तरी हिम्मत सोडत नाहीत, तसेच राजकारणातील हे निष्ठावंत सत्ता असो नसो,पक्ष वाढीसाठी सतत झटत असतात,खुरट्या झुडपांच्या वेडा सारखे या निष्ठावंतांना ध्येयाचे वेड असते. तर बांडगुळांचे लक्ष केवळ मोठ्या झाडाच्या आधारे उदर भरण करणे एव्हढेच लक्ष्य असते. राज्यातही अशा बांडगुळांची संख्या नवी नाही. राज्यात बेताल वक्तव्याचे पीक मोठया प्रमाणात येत असून, यातून केवळ सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यांशी प्रश्‍नावरून नजर हटवणे हाच मुख्य मुद्दा असल्याचे सध्याच्या वातावरणावरून तरी दिसून येते. पेट्रोल-डिझेलचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहे, खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडत चालल्या आहे. भाजीपाला, डाळी, यासह सर्वच क्षेत्रात महागाईचा आगडोंब उसळला असतांना, आपल्याला सामाजिक धूव्रीकरण घडवून आणण्याचे मनसुबे दिसून येत आहे. राज्यात मनसेने भोंग्यांचा प्रश्‍न हाती घेतला, दुसरीकडे रामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंतीच्या दिवशी दगडफेक जाळपोळ अनेक ठिकाणी करण्यात आली, यातून राज्यातीलच नव्हे तर देशात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ब्राम्हण महासंघाने केलेले आंदोलन हा त्याचाच परिपाक आहे. विशेष म्हणजे मिटकरी यांनी काही नवीन संशोधन करून वक्तव्य केलेले नाही. तर यासंबंधी वेदोक्त, विरुद्ध पुरोणाक्त वाद महाराष्ट्राला चांगलाच परिचयाचा आहे. मात्र एकीकडे हनुमान चालिसा सुरू असतांना, मिटकरी यांनी केलेल्या विधानावरून ब्राम्हण महासंघाने आंदोलन करत, पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सांस्कृतिक संघर्ष ढवळून काढला आहे. मात्र सत्ता मिळविण्यासाठी आतुर झालेल्या भाजपला, यानिमित्ताने ही संघर्षाची नवी नांदी हवीच आहे. जेम्स लेन, बाबा पुरंदरे यांचा विषय मागे पडत असतांना, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा विषय समोर आला. हा विषय तसा जुनाच असला, तरी त्यातून होणारे राजकारण पुन्हा एकदा महाराष्ट्राचा इतिहास ढवळून टाकणार, यात नवल नाही.

COMMENTS