Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात आढळला मोबाईल संच

पुणे : येरवडा कारागृहातील एका बराकीतील स्वच्छतागृहात मोबाईल संच ठेवल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून येरवडा पोलीस ठाण्यात तक्

कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून फरार
येरवडा कारागृहात कैद्याची हत्या
अट्टल गुन्हेगार येरवडा जेलमधून फरार

पुणे : येरवडा कारागृहातील एका बराकीतील स्वच्छतागृहात मोबाईल संच ठेवल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाकडून येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. या पूर्वी कारागृहात गांजा सापडला होता. कारागृहात गांजा पोहोचविल्याप्रकरणी एका कारागृह रक्षकावर कारवाई करून त्याला अटकही करण्यात आली होती.
कारागृह प्रशासनाच्या वतीने सागर बाजीराव पाटील (वय 38,रा. कारागृह वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील बराकी आणि परिसराची नियमित तपासणी केली जाते. कारागृहातील अधिकारी भिरू खळबुटे, अतुल तोवर कारागृहातील सर्कल क्रमांक एक आणि बराक क्रमांक तीनमधील स्वच्छतागृहाची तपासणी करत होते. त्या वेळी स्वच्छतागृहातील पत्रा वाकल्याचे आढळून आले. पत्रा उचकटून पाहिले असता तेथे मोबाईल संच ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. मोबाईलमध्ये सीमकार्ड नसून बॅटरीचे चार्जिंग करण्यात आले नव्हते. या घटनेची माहिती त्वरित कारागृहातील वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली. कारागृहाच्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाईसाठी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल संचाचा वापर कोणी केला, तसेच कारागृहात मोबाईल पोहोचला कसा, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अशोक काटे तपास करत आहेत.

संगमवाडीतील नदीपात्रात सापडले रिव्हॉल्वर – संगमवाडीतील नदीपात्रात रिव्हॉल्वर सापडल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. संगमवाडीतील नदीपात्रात रिव्हॉल्वर आणि शिवलिंग मंगळवारी दुपारी सापडले. याबाबतची माहिती येरवडा पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रिव्हॉल्वर ताब्यात घेतले असून या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. रिव्हॉल्वर जुने असून देशी बनावटीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन महिन्यांपूर्वी वारजे भागातील नाल्यात पोलिसांना काडतुसांनी भरलेली पिशवी आणि पिस्तूल सापडले होते. नाल्यात काडतुसांनी भरलेली पिशवी आणि पिस्तूल टाकून दिल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

COMMENTS