महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या राजकारणाची चर्चा झाली नाही, असा दिवस गेला नसेल, असं झंझावाती राजकीय व्यक्तिमत्व असणारे अजितदादा पवार यांच्या व

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या राजकारणाची चर्चा झाली नाही, असा दिवस गेला नसेल, असं झंझावाती राजकीय व्यक्तिमत्व असणारे अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्याच्या बातमीने आख्खा महाराष्ट्र काल सकाळी सुन्न होऊन गेला. महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्त्वे अशी होऊन गेली की, जी केवळ पदांमुळे नव्हे तर त्यांच्या स्वभावामुळे, निर्णयक्षमतेमुळे आणि कामाच्या वेगामुळे ओळखली गेली. अजितदादा पवार हे त्यातीलच एक ठळक नाव. त्यांच्या नावातच एक वेग होता, एक ठामपणा होता, आणि एक असा आत्मविश्वास ही होता, जो समोरच्याला थक्क करून सोडत होता. अजितदादा केवळ राजकारणी नव्हते, तर ते सामान्यांशी नाळ जोडलेले ‘लोकनेते’ होते. आजच्या परिस्थितीत जेव्हा प्रचंड लोकसंपर्क असणारा दुवा निखळतो, तेव्हा निर्माण होणारी पोकळी ही केवळ राजकीय नसते, ती वैयक्तिक आणि भावनिक सुद्धा असते. असे उमदे नेतृत्व वैचारिक मतभेद असूनही एकमेकांबद्दल असलेला आदर आणि जिव्हाळा उल्लेखनीय ठरतो. सत्तेच्या शिखरावर असूनही मातीशी आणि ग्रामीण प्रश्नांशी असलेली घट्ट पकड. विधानसभेत किंवा जाहीर सभेत शब्दांच्या माध्यमातून समोरच्याला निरुत्तर करण्याची, पण मर्यादा न ओलांडण्याची कला. पक्षाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारी आणि सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारी वृत्ती. खरंच, अशा दिग्गज नेत्यांच्या जाण्याने एका ‘संस्कारक्षम’ राजकारणाचा अध्याय संपल्यासारखा वाटतो. ‘निःशब्द’ हा शब्द या भावनेला पूर्णपणे न्याय देतो. महाराष्ट्राच्या राजकारणावर इतका खोलवर प्रभाव टाकणारा नेता आजच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात दुसरा शोधून सापडत नाही. त्यांचं सकाळी वक्तशीरपणे लवकर उठणं, कोणत्याही व्यसनापासून लांब असणं, प्रत्येकाशी संवाद ठेवणं आणि स्वतःसोबत इतरांच्या वेळेचीही कदर राखणं, अश्या अनेक गोष्टी लोकांच्या कायम स्मरणात राहतील. अजित पवारांना नेमकं ठाऊक होतं. राजकीय नेता जो लोकांमधून निवडणूक लढवतो तो प्रामुख्याने आपली वोट बँक शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करतो. अजितदादा पवार देखील त्यास अपवाद नव्हते. मराठा वोट बँकेचा मतदार संघ शाबूत राखण्यासाठी त्यांनी काही कसरती केल्या. पण, त्यामुळे त्या मतदारसंघाला कुठेही धक्का लागेल असं कोणतंही काम त्यांनी केलं नाही. उलट ह्या मतदारसंघाची वर्चस्ववादी मानसिकता कशी गोंजारली जाईल, कशी कुरवाळली जाईल याची कायम काळजी घेत असताना, ग्रामीण राजकारणात हिंदू-मुस्लिम वादातून दोन ध्रूवीय मानसिकता कधी वरचढ होऊ दिली नाही! अजितदादा म्हणजे नुसते राजकारणी नव्हते; ते म्हणजे ‘काम आधी, चर्चा नंतर’ अशी भूमिका घेणारा नेता. प्रशासनावरची त्यांची पकड, आकड्यांची अचूक मांडणी, निर्णय घेताना दाखवलेली निर्भयता—या सगळ्यामुळे ते नेहमीच वेगळे ठरले. अनेकदा त्यांच्या थेट बोलण्यावर टीका झाली, पण त्या थेटपणामागे लपलेली तळमळ, कामाची ओढ आणि जबाबदारीची जाणीव अनेकदा दुर्लक्षित राहिली.
बारामतीची माती, सहकार चळवळ, पाणी प्रश्न, शेतकरी, अर्थकारण—हे विषय अजितदादांच्या राजकारणाचे केंद्र राहिले. अर्थमंत्री म्हणून असो वा उपमुख्यमंत्री म्हणून, त्यांनी राज्याच्या तिजोरीकडे केवळ आकड्यांच्या नजरेने पाहिले नाही, तर त्या आकड्यांच्या मागे उभ्या असलेल्या सामान्य माणसाच्या गरजाही पाहिल्या. कठोर निर्णय घ्यावे लागले तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले नाही; आणि निर्णयाचे परिणाम भोगण्याची जबाबदारीही त्यांनी स्वतःवरच घेतली.
वैयक्तिक आयुष्यात अजितदादा कमी बोलणारे, भावनांना शब्दांपेक्षा कृतीतून व्यक्त करणारे. त्यांच्या भोवती नेहमी कार्यकर्त्यांचा गराडात वावरणारा नेता म्हणूनच त्यांना ओळखले जाईल. ते ऐकत, कधी रागावतत, पण कधीच दुर्लक्ष किरत नव्हते. कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून “काम कर” एवढे दोन शब्द सांगणारा नेता आज दुर्मिळ आहे, आणि अजितदादा त्या दुर्मिळतेत मोडतात. राजकारणात मतभेद असू शकतात, टीका होऊ शकते, पण अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर उमटवलेला ठसा नाकारता येत नाही. ते वादळी होते, हो; पण ते वादळच कधी कधी ठप्प झालेल्या यंत्रणेला गती देते. त्यांच्या उपस्थितीनेच अनेकदा निर्णयप्रक्रियेला वेग येत असे.—आणि तो वेग महाराष्ट्राने अनुभवला आहे.

COMMENTS