कर्जत । प्रतिनिधीः धाकटी पंढरी म्हणून सर्वपरिचित असलेल्या कर्जत नगरीचे आराध्य दैवत संत श्री सद्गुरू गोदड महाराज यांच्या भक्त निवासाचा भूमिपूजन सो
कर्जत । प्रतिनिधीः धाकटी पंढरी म्हणून सर्वपरिचित असलेल्या कर्जत नगरीचे आराध्य दैवत संत श्री सद्गुरू गोदड महाराज यांच्या भक्त निवासाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. आ. रोहित पवार यांनी मविआ सरकार असताना नगरविकास विभागाकडे भक्त निवासाबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पाच कोटींचा निधी या भक्तनिवासासाठी मंजूर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार या कामावरील स्थगिती उठल्यानंतर आता या कामाचे भूमिपूजन पार पडले आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी आ. रोहित पवार यांनी जनतेला भक्तनिवासाची इमारत उभारली जाईल, असा शब्द दिला होता. त्यानुसारच आता मतदारसंघातील पाच कोटींच्या भव्य भक्तनिवास इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच कर्जत शहरात पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. बाहेर गावावरून दर्शनासाठी येणारे भक्तजन, महंत व धार्मिक गुरु यांना राहण्याची व्यवस्था,त्यासोबतच गरजू लोकांसाठी छोटेखानी विवाह समारंभ करण्याची व्यवस्था, जेवण बनवण्याची व जेवण करण्यासाठीची व्यवस्था देखील या भक्तनिवासाच्या इमारतीत असणार आहे. संतश्री सद्गुरू गोदड महाराज यांच्या प्राचीन ग्रंथाचे संग्रहालय होण्यासाठी देखील या इमारतीमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आ. पवार यांच्यासह अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील मंडळी तसेच मतदारसंघातील संत श्री सद्गुरू गोदड महाराज यांचे भक्तगण, नागरिक मोठ्या संख्येने भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित होते.
COMMENTS