अंबाजोगाई प्रतिनिधी - समाजव्यवस्थेत समाजात घडत असलेल्या अन्यायाविरुद्ध जाब विचारून न्यायाची भूमिका घेणारा क्रांतिकारी समाज निर्माण झाला पाहिजे अ
अंबाजोगाई प्रतिनिधी – समाजव्यवस्थेत समाजात घडत असलेल्या अन्यायाविरुद्ध जाब विचारून न्यायाची भूमिका घेणारा क्रांतिकारी समाज निर्माण झाला पाहिजे असे मत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा इंडीयन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक सचीव डॉ राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.
सारनाथ नगर येथे साहित्य सम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याता म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी राजकिशोर मोदी, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रा अरुंधती पाटील, प्रा अनिल नरसिंगे,जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा कल्पनाताई गायकवाड,सचीव कविताताई वाघमारे, उपाध्यक्ष मीनाताई गव्हाणे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ राजेश इंगोले यांनी डॉ अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्य सम्राटच नव्हते तर ते पहिले शिवशाहीर होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याला भारताबाहेर सातासमुद्रापार नेत थेट रशियाच्या चौकाचौकात महाराजांचा गौरवशाली इतिहास गायला. तात्कालीन चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे अन्यायाचे चटके बसलेल्या अण्णाभाऊंच्या साहित्यात पदोपदी या अन्यायाविरुद्धचा राग प्रकट होतो. जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे अन्यायाला प्रतिकार करणारा फकिरा ,वारणेचा वाघ निर्माण होतो नव्हे झाला पाहिजे ही अपेक्षा साहित्यसम्राट अण्णाभाऊंच्या साहित्यातून प्रकट होते. अण्णाभाऊंच्या साहित्यात सर्वसामान्य माणूस, त्याच्या वेदना, त्याची दुःख इतक्या सहजतेने प्रकट होतात की जणूकाही ती कथा आपल्या आजूबाजूलाच घडत असल्याचे वाटत राहते, इतक्या जिवंतपणे,ताकतीने ती कथा अण्णाभाऊच्या साहित्यातून प्रकट होते. सुरवातीला कम्युनिस्टांच्या प्रभावाखाली असलेले अण्णाभाऊ नंतर मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित झाल्याचे जाणवते. जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव या वाक्यातून त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगिकारल्याचे जाणवते. ही न्यायव्यवस्था कैकांची रखेल झाली,ही सांसद हिजड्यांची हवेली झाली मी न्याय मागू कुणाकडे ही व्यवस्था भ्रष्टाणे रंगीन झाली या कवितेतून त्यांनी डॉ बाबासाहेबांचा क्रांतिकारी विचार पुढे मांडत संविधान खूप चांगले आहे पण त्याची अंमलबजावणी करणारे जर चोर असतील तर सर्वसामान्य जनता होरपळून निघेल हा संदेश दिल्याचे जाणवते. जयंतीचा उद्देश समाजाने एकत्र यावे, एकमेकांची मदत करावी, वैचारिक प्रबोधन करावे, अन्यायाच्या विरुद्ध एकत्र होऊन त्याचा प्रतिकार करावा हाच असला पाहिजे हे सांगत समाजाने क्रांतीची मशाल हातात तेवती ठेवून जागृतीचा वणवा मस्तकातून विझू देऊ नये असा संदेश डॉ राजेश इंगोले यांनी दिला. यावेळी प्रा अरुंधती पाटील, प्रा अनिल नरसिंगे,राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे यांचे समयोचित मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनंत कांबळे,आभार प्रदर्शन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल वाघमारे, राजपंखे ,ग्रंथपाल गादेकर यांनी प्रयत्न केले.यावेळी बालशाहीर आविष्कार एडके व क्रांती एडके यांचा जनप्रबोधन पर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
COMMENTS