महाराष्ट्रात सध्या कोणत्याही निवडणुका जवळ आलेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकांना साधारणतः एक वर्षाचा कालावधी असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्था
महाराष्ट्रात सध्या कोणत्याही निवडणुका जवळ आलेल्या नाहीत. लोकसभा निवडणुकांना साधारणतः एक वर्षाचा कालावधी असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिकेच्या निवडणुका या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच होणार आहे. मात्र तरीदेखील महाराष्ट्रात राजकीय पीक जोमात आल्याचे दिसून येत आहे. दररोजचे होणारे खलबते, रणनीती, मोर्चेबांधणी सर्वच पक्षांकडून जोमात सुरू आहे. इतर राज्यात आजमितीस तरी अशी परिस्थिती नाही. मात्र महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होण्यामागे अनेक कारणे आहेत. प्रथम कारण म्हणजे शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षाजवळ संख्याबळ नगण्य उरले आहे. शिंदे गटाने भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे गटासाठी सहानुभूतीचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी आणि शिंदे गटाला नामोहरम करण्यासाठी ठाकरे गटाकडून रणनीती आखण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गट बाहेर तर पडला, मात्र आगामी निवडणुकांमध्ये जर आपल्या जागा कायम राखू शकलो नाही, तर शिंदे गटावर मोठी नामुष्की ओढवू शकते. त्यामुळे शिंदे गट आपली सर्व ताकद पणाला लावतांना दिसून येत आहे. तर दुसरीकडे भाजपला देखील चिंता सतावत आहे. आता सोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना नाही. अशावेळी शिंदे गटाच्या जोरावर राज्यात सत्ता टिकवणे आणि भाजपचे आमदार जास्तीत जास्त आमदार निवडणूक आणण्याचे आव्हान भाजसमोर आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगे्रसला मोठ्या भावाचे स्वप्न पडायला लागल्यामुळे जास्तीत जास्त जागा जिंकून आणत आपला मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. तर कर्नाटक विजयामुळे काँगे्रसचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्याकडून स्वबळाचा नारा देण्यात येतो. त्यामुळे राज्यात सध्यातरी कोणत्याही निवडणुका नसल्या तरी, सर्वच पक्ष आगामी परीक्षा तयारीनिशी देण्यासाठी तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. यात कोणता पक्ष उत्तीर्ण होतो, हे निकाल आल्यावरच कळेल. मात्र प्रतिस्पर्ध्यांना मात देण्यासाठी सर्वच पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून, त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून, शिंदे गटाला केंद्रात देखील दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासोबत भाजप आणि शिंदे गटाने एकत्र निवडणुका लढण्याची घोषणा केल्यामुळे, विरोधकांना जोरदार टक्कर बघू शकते. त्यासोबतच शिंदे आणि भाजप सोबतीला राज ठाकरे यांना घेवू शकते. कारण भाजपला उद्धव ठाकरे नको असले तरी, शिंदे गट आणि भाजपला ठाकरे कुणीतरी हवा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना सोबतीला घेवून आगामी निवडणूका लढण्याची शक्यता असली तरी, राज ठाकरे देखील सावध आहेत. कारण फडणवीस कृष्णकुंजवर जात आहेत, चर्चा होत आहे, मुख्यमंत्री शिंदे भेट घेताहेत, मात्र युतीवर शिक्कामोर्तब होत नसल्यामुळे राज ठाकरे यांनी आपली नेहमीची भूमिका कायम ठेवली आहे. चुका दिसल्या की कोरडे ओढ. उद्या मतदारांसमोर जातांना आपली गोची व्हायला नको, म्हणून त्यांनी सावध खेळी केली असली तरी, मुंबई महापालिकेत राज ठाकरे निर्णायक ठरू शकतात, याची जाणीव भाजपला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेडला सोबत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांचा सामना चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.
COMMENTS