कोपरगाव प्रतिनिधी ः मेंढेंगिरी समितीचा अन्यायकारक अहवाल व समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी कमी झाल्याने पाण्याचा प्

कोपरगाव प्रतिनिधी ः मेंढेंगिरी समितीचा अन्यायकारक अहवाल व समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी कमी झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे उर्ध्व गोदावरी खोर्यात वळवले तर कोपरगाव तालुक्यासह नगर, नाशिक जिल्ह्यांचा व मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या प्रकल्पाला सरकारने गती द्यावी म्हणून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून नगर, नाशिकसह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन व्यापक लढा उभारण्याची गरज आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शेतकर्यांनी व जनतेने साथ द्यावी. तसेच येत्या 2 ऑक्टोबरला होणार्या ग्रामसभेत याविषयी ठराव करावा, असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.
कोपरगावचे विद्यमान आमदार कोपरगाव मतदारसंघासाठी आपण गेल्या साडेतीन वर्षांत 3 हजार कोटींचा निधी आणल्याचे सांगत सुटले आहेत. जर त्यांनी खरोखर एवढा निधी आणला असता तर मतदारसंघातील प्रत्येक गावाला निधी मिळून पाणी, रस्ते व विकासाचे इतर प्रश्न कायमचे सुटले असते; पण प्रत्यक्षात तसे घडल्याचे दिसत नाही. विद्यमान आमदार भूलथापा मारून जनतेला वेड्यात काढत आहेत. ज्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याला मूकसंमती देऊन कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी घालवले तेच लोकप्रतिनिधी आता पाणीप्रश्नी खोटी वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी खरमरीत टीका कोल्हे यांनी यावेळी केली. कोपरगाव तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (25 सप्टेंबर) व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष तथा कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद शेतकरी, संजीवनी उद्योग समूहातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बिपीनदादा कोल्हे म्हणाले, सन 2005 मध्ये तत्कालीन सरकारने बनविलेला समन्यायी पाणी वाटप कायदा नगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकर्यांच्या मुळावर उठला आहे. उर्ध्व गोदावरी खोरे हे अतितुटीचे असून, समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत दरवर्षी नाशिक-नगर जिल्ह्यातील धरणातील पाणी मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात सोडले जात असल्याने या परिसरातील शेती उद्ध्वस्त झाल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.
डायबेटिस फ्री शुगर निर्मिती करणार – साखरेमुळे मधुमेहाचे (डायबेटिस) रुग्ण वाढत असल्याचे सांगत साखरेला रेड कॅटेगरीमध्ये टाकण्याचा विचार सुरू आहे. असे झाले तर साखर कारखाने कसे टिकणार, अशी भीती व्यक्त होत आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उसापासून साखर उत्पादनाबरोबर देशात सर्वप्रथम जूसपासून इथेनॉल उत्पादन सुरू केले. आताही काळानुरूप पावले उचलत डायबेटिस फ्री शुगर निर्मिती करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याचे बिपीनदादा कोल्हे यांनी यावेळी जाहीर केले. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा डायबेटिस फ्री शुगर निर्मिती करणारा भारतातील पहिलाच कारखाना ठरेल, असे ते म्हणाले.
COMMENTS