Homeताज्या बातम्यासंपादकीय

कथनी आणि करणीतील फरक

खरंतर देशामध्ये विरोधकांच्या प्रमुख भूमिकेमध्ये असलेले आम आदमी पक्ष, अर्थात आप. आपल्याला सर्वसामान्यांची कणव असल्याचा देखावाच हा पक्ष करत असल्याच

काँगे्रस आणि प्रादेशिक पक्ष
भारताचा विजयी ‘षटकार’
खडसे अडकले राजकीय चक्रव्युहात

खरंतर देशामध्ये विरोधकांच्या प्रमुख भूमिकेमध्ये असलेले आम आदमी पक्ष, अर्थात आप. आपल्याला सर्वसामान्यांची कणव असल्याचा देखावाच हा पक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर केजरीवाल यांना एक सहानुभूती मिळत होती, त्यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा उंचावतांना दिसून येत होती. मात्र काही दिवसांपूर्वी आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासस्थानी मारहाण करण्यात आली आहे. त्याठिकाणी नेमके काय झाले, याबाबत मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांनी एक चकार शब्द देखील काढला नाही. एक महिला, त्यांच्याच पक्षातील खासदार असलेल्या व्यक्तीला केजरीवालांचा सहायक बेदम मारहाण करतो, कानशिलात लगावतो, पोटात लाथा मारतो, तरी देखील केजरीवाल चकार शब्द काढत नाही, यातच सर्व काही आले.

खरंतर केजरीवाल यांनी अशा व्यक्तीला आपला सहायक ठेवण्याची खरी गरज नव्हती. त्याव्यक्तीविरोधात केजरीवाल यांनी समोर येण्याची खरी गरज होती. स्वाती मालीवाल या आता जरी राज्यसभेच्या खासदार असल्या तरी, त्या अनेक वर्ष दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. अशा व्यक्तीवर केजरीवाल यांचा सहायक बेदम मारहाण करत असेल आणि तरी केजरीवाल याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतील तर केजरीवाल यांच्या कथनी आणि करणीत फरक असल्याचे दिसून येत आहे. बरेच दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा माध्यमांसमोर येत होती. मात्र तरीही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. काही दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर मालीवाल यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या एफआयआरमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या गैरवर्तन आणि घटनाक्रमाचा धक्कादायक तपशील त्यांनी मांडला आहे. एफआयआरनुसार मालीवाल यांनी आरोप केला आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहाय्यक विभव कुमारने त्यांना सात ते आठवेळा कानाखाली लगावली. त्यांच्या पोटात लाथा मारल्या. त्यावेळी माझी मासिक पाळी सुरू होती, तरीही त्यांनी मारहाण केली. 13 मे रोजी सकाळी 9 वाजता केजरीवाल यांच्या घराच्या ड्रॉईंग रूममध्ये हे भयानक कृत्य घडले. घटनेच्या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. तरीदेखील केजरीवाल या घटनेमध्ये मध्यस्थी करू शकले नाहीत. त्यामुळे केजरीवाल यांच्या संमतीनेच ही घटना तर घडली नाही ना, अशी शंका घेण्यास देखील वाव मिळतो. सदर घटना 13 मे रोजी झाल्यानंतर चौथ्या दिवशी या प्रकरणाला वाचा फुटते. शिवाय पंजाब दौर्‍यावर केजरीवाल असतांना माध्यमांकडून त्यांना यासंदर्भात विचारले असता, ते टाळाटाळ करतात, यासंदर्भात कोणतेही भाष्य करत नाही, त्यामुळे केजरीवाल यांच्या सर्वसामान्यांबद्दल असलेली कणव याबद्दल शंका उपस्थित होते.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केजरीवाल तातडीने पंजाबमधील प्रचार सोडून दिल्लीत पोहोचले आहेत. कदाचित स्वाती मालीवाल या प्रकरणावर बोलणार नाहीत, गुन्हा दाखल करणार नाहीत, आक्रमक पवित्रा घेणार नाहीत, असेच कदाचित केजरीवाल यांना वाटत नसावे. मात्र केजरीवाल यांनी लाथा-बुक्क्यांवर मारहाण होईपर्यंत प्रकरण जावू देण्याची गरज नव्हती. दोघांना सोबत घेऊन काही प्रश्‍न असतील, काही वाद असतील तर तो प्रश्‍न केजरीवाल यांना सोडवता आला असता. मात्र त्यांनी याप्रकरणात आपल्या सहायकावर विसंबून राहण्यात धन्यता मानली. कारण 13 मे रोजी स्वाती मालीवाल यांना मारहाणीची घटना घडल्यानंतर विभव कुमार पंजाबमध्ये केजरीवालांच्या सोबत एका गाडीत दिसून आला होता. त्यामुळे विभव कुमारच्या या कृतीला केजरीवालांची मूकसंमती होती काय असा सवाल उपस्थित होत आहे. कदाचित उद्या मालीवाल यांनी माघार घेतल्यास नवल वाटायला नको, मात्र यानिमित्ताने आपमध्ये महिलांचा कशाप्रकारे सन्मान केला जातो, याचेच प्रतिबिंब या घटनेतून दिसून येते.

COMMENTS