Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईचा किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू जोडण्यात यश

मुंबई ः मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गत महिन्यात 26 एप्रिल रोजी मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग हा पहिल्या महाकाय तुळई (बो

वीजपंप चोरणारे कर्जत पोलिसांकडून जेरबंद
पुण्यातील बेपत्ता तरुणीचा मृतदेह नीरा नदीत सापडला
सर्वच आता निवडणूकमय ! 

मुंबई ः मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने गत महिन्यात 26 एप्रिल रोजी मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग हा पहिल्या महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) ने सांधल्याचा टप्पा पार केल्यानंतर बुधवारी पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनी दुसरी महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) देखील यशस्वीपणे स्थापन करण्यात आली. खुल्या समुद्रात लाटांचा अंदाज घेत मोठ्या तराफ्याच्या मदतीने ही तुळई जोडली गेली. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक आश्‍विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्‍विनी जोशी, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी, ‘एचसीसी’चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, उपाध्यक्ष अर्जुन धवन, मोहिमेचे प्रमुख संतोष राय आदींसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते. बुधवारी पहाटे 3 वाजेपासून तुळई टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. प्रवाहकीय हवामानाचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने ही दुसरी तुळई आधी बसविलेल्या पहिल्या तुळईकडे सरकविण्यात आली. चारही बाजूचे कोन तंतोतंत जुळल्यानंतर पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनी अडीच हजार मेट्रीक टन वजनाची तुळई यशस्वीपणे जोडण्यात आली. याआधी, प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेवून गत 26 रोजी पहिली तुळई स्थापन करण्यात आली होती. तो अनुभव गाठीशी असल्याने दुसरी तुळई स्थापन करण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाच्या पथकाचा आत्मविश्‍वास दुणावला होता.  दुसरी तुळई स्थापन करताना तितकीशी मोकळीक नव्हती. पहिल्या तुळईचा अंदात घेत अतिशय सावधपणे ही मोहीम पार पाडण्याचे मोठे आव्हान होते. पहिल्या तुळईपासून अवघ्या 2.8 मीटर अंतरावर दुसरी तुळई स्थापन करणे काहीसे जोखमीचे होते. परंतु या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी आणि कामगार यांनी अतिशय कुशलतेने ही मोहीम पार पाडली. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही तुळईंवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-5 या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

अडीच हजार मेट्रिक टन वजनाची तुळई – मुंबई किनारी रस्त्यावर स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या तुळईपेक्षा तुलनेने दुसरी तुळई ही वजनाने, लांबी-रुंदीने मोठी आहे. दुसरी तुळई 31.7 मीटर रुंद, 31 मीटर उंच आणि 143 मीटर लांब आहे, तर वजन अडीच हजार मेट्रिक टन आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे लहान सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. पहिल्या तुळईपासून केवळ 2.8 मीटर अंतर फरक लक्षात घेता दुसरी तुळई स्थापन करणे आव्हानात्मक होते. न्हावा बंदरातील माझगाव गोदी केंद्रातून रविवारी 12 मे रोजी सकाळी दुसरी तुळई घेवून तराफा (बार्ज) निघाला होता.

COMMENTS