हैदराबाद ः देशामध्ये एकीकडे तापमानात वाढ होत असतांना दुसरीकडे अवकाळी पावसाचा धुमाकूळ बघायला मिळत आहे. हैदराबाद शहरामध्ये अचानक झालेल्या मुसळधार प
हैदराबाद ः देशामध्ये एकीकडे तापमानात वाढ होत असतांना दुसरीकडे अवकाळी पावसाचा धुमाकूळ बघायला मिळत आहे. हैदराबाद शहरामध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाच्या धुमाकुळाने शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. तसेच शहरातील बाचुपल्ली भागात निर्माणाधीन अपार्टमेंटची भिंत कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका चार वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे. मृतातील सर्व नागरिक ओडिशा आणि छत्तीसगडमधील कामगार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तेलंगणा राज्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामध्ये हैदराबादसह अनेक शहरांमध्ये पावसाने कहर केला. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. त्यासोबतच अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या प्रवाशांना सहन करावी लागली. हैदराबाद शहरात साचलेले पाणी उपसण्यासाठी आणि रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यासाठी आपत्ती निवारण दलाची (डीआरएफ) पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी दिली. भारतीय हवामान खात्याकडून तेलंगणात ’यलो’ अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ‘तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि यनम, रायलसीमा, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काही भागांत पुढील पाच दिवसांत वादळी वार्यासह पावसाच्या तुरळक ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे’ असे हवामान खात्याने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
COMMENTS