देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना, विविध पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत त्यांना संधी दिली असली तरी महाराष्ट्रामध्ये म
देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना, विविध पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत त्यांना संधी दिली असली तरी महाराष्ट्रामध्ये मात्र अजूनही अनेक जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाही. याशिवाय ज्या जागेवर नावे जाहीर केली आहेत, त्यातून घाऊक पक्षांतर दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार विचका झाल्याचे दिसून येत आहे, त्याला प्रमुख कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यामुळे यातील दोन गट महायुतीमध्ये तर दोन गट महाविकास आघाडीमध्ये सहभागी आहे. या विचक्यामुळे या पक्षांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात अडचणी येतांना दिसून येत आहे, त्यामुळे घाऊक पक्षांतरांचा भाव चांगलाच वधारतांना दिसून येत आहे. याची सुरूवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून झाली. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँगे्रसचे डॉ. अमोल कोल्हे शिरूरमतदारसंघातून लोकसभा लढत आहे, मात्र त्यांच्याविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार नव्हता. अजित पवारांनी अनेक नावांची चाचपणी केल्यानंतर तगडा, आणि आव्हान देऊ शकेल असा उमेदवार नसल्यामुळे अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना आयात केले, येथून घाऊक पक्षांतराला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता आयात केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात येत असली तरी पक्षात अनेक वर्ष काम करणार्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, ही राजकीय पक्षांची मोठी नामुष्की असल्याचे दिसून येत आहे. शिवाय उमेदवारी मिळण्यासाठी कोणत्याही पक्षात जाण्याची तयारी उमेदवाराची दिसून येत आहे. याचाच अर्थ सत्ता मिळवण्यासाठी आपण कोणत्याही पक्षात जावू शकतो, असाच संदेश उमेदवार देत तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतो. शिरूरनंतर रावेरचे उदाहरण देता येईल. शरद पवारांनी रावेरमधून श्रीराम पाटील यांना संधी दिली आहे. पाटील हे उद्योजक असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पक्षांतर शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारी मिळाली, मात्र येथेही शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही तर, आयात केलेल्या उमेदवाराला संधी मिळाल्याचे दिसून येत आहे. शिरूर, रावेरनंतर धाराशिवमध्ये महायुतीने देखील याच पावलावर पाऊल टाकल्याचे दिसून येत आहे. धाराशिवची जागा अजित पवारांच्या वाट्याला आली, मात्र त्यांच्याकडे तगडा उमेदवार नसल्यामुळे भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर त्यांना उमेदवारी दिल्याचे दिसून येत आहे. माढ्यात देखील धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहेे. अमरावतीमध्ये देखील नवनीत राणा यांना भाजपमध्ये आयात केल्यानंतर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. वानगीदाखल काही मतदारसंघाची उदाहरणे देण्यात आली असली तरी, बहुतांश मतदारसंघात आयात उमेदवारांना प्राधान्य देण्यात सर्वच राजकीय पक्षांनी धन्यता मानली आहे. थोडक्यात काय तर, सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या अस्सल कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवारांना संधी देण्यात प्राधान्य देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्ते खस्ता खातात, पक्ष वाढवतात, संघटना मोठी करतात, मात्र पदे त्यांना दिली जात नाही, तर ती पदे आयात उमेदवारांना देण्यात येतात, त्यामुळे आंदोलने करतांना कार्यकर्ते हवे असतात, पक्षाची विचारधारा रूजवण्यासाठी कार्यकर्ते हवे असतात, मात्र पदाची उमेदवारी देण्याची वेळ येते तेव्हा आयात उमेदवारांना प्राधान्य देण्यात येते, हा सिलसिला कायम सुरू असून, त्याला एकही राजकीय पक्ष अपवाद नाही, त्यामुळे आयात आणि घाऊक पक्षांतरांचा भाव सध्या वधारल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS