पुणे : शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या अनेक घटना उजेडात येत असतांना आता, पीएच.डी पदवीसाठी सादर केलेला प्रबंध नाकारून सुधारणा करत पुन्हा सादर कर
पुणे : शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या अनेक घटना उजेडात येत असतांना आता, पीएच.डी पदवीसाठी सादर केलेला प्रबंध नाकारून सुधारणा करत पुन्हा सादर करणे आणि त्याला मान्यता देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या मार्गदर्शक प्राध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. प्राध्यापिकेला ताब्यात घेतले असून ही कारवाई सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात करण्यात आली.
डॉ. शकुंतला निवृत्ती माने (वय 59) असे लाच स्वीकारणार्या मार्गदर्शक प्राध्यापिकेचे नाव आहे. याबाबत एका 40 वर्षीय पीएचडी करणार्या प्राध्यापकाने ‘एसीबी’कडे तक्रार केली होती. तर, डॉ. माने या सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. तक्रारदार हे प्राध्यापक असून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएच.डी पदवी प्राप्त करून घेण्यासाठी ऑनलाइन प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता तयार केला आहे. हा प्रबंध सादर करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. माने यांची विद्यापीठाकडून नियुक्ती झालेली आहे. तक्रारदाराने सादर केलेला प्रबंध नाकारण्यासाठी व सुधारणा करून पुन्हा सादर करणे आणि मान्यता देण्यासाठी डॉ. माने यांनी पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत ‘एसीबी’कडे तक्रार केली होती. त्यानुसार ‘एसीबी’ने सापळा रचला. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता डॉ. माने यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी वीस हजार रुपयांचा पहिला हप्ता पंचासमक्ष स्वीकारताना डॉ. माने यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार उशीरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS