राहुल गांधी यांची काँग्रेस मधील सक्रियता वाढल्यापासूनच काँग्रेसमध्ये जुने विरुद्ध नवे, असा वाद सुरू झाला होता. काँग्रेसमधील जुन्या नेत्यांनी राहु
राहुल गांधी यांची काँग्रेस मधील सक्रियता वाढल्यापासूनच काँग्रेसमध्ये जुने विरुद्ध नवे, असा वाद सुरू झाला होता. काँग्रेसमधील जुन्या नेत्यांनी राहुल गांधींना साथ देण्यात संशयास्पद भूमिका निभावली होती. त्यामुळे, काँग्रेस या संघर्षातून तरुणांकडे अधिक प्रभावीपणे मार्गक्रमण करेल, असे वाटत होते; परंतु, मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसची आपल्या नेतृत्वातील टीम बनविताना अतिशय जुन्या लोकांना संधी देऊन, काँग्रेसमध्ये पुन्हा ज्येष्ठांचे राज्य असेल, अशा प्रकारचा संदेश दिला आहे. काँग्रेसच्या जुन्या नेतृत्वांमध्ये नव तरुणांना आकर्षित करण्याची कितपत शक्ती आहे, यावर आताच विचार करणे उचित नाही. परंतु, या नव्या टीम मधून काँग्रेसमध्ये तरुणांसाठी आशादायी स्थान आहे की नाही, हा प्रश्न नेमकेपणाने उभा राहतो. त्याचबरोबर काँग्रेसचे वेगवेगळ्या राज्यांतील जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वामध्ये देखील करिष्मायुक्त कार्य करतील, असा कोणताही नेता प्रभारी म्हणून निवडलेला दिसत नाही! त्याचबरोबर, लोकसभेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वपूर्ण असणाऱ्या राज्यामध्ये अविनाश पांडे यांना जबाबदारी देऊन, उत्तर प्रदेशातील उच्च जातीयांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी पुन्हा एक प्रयोग झाला असला तरी, या प्रयोगामागे नागपूरचा एक पाठिंबा दिसतो आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये झालेले फेरबदल हे नेमक्या कोणत्या समीकरणातून झाले, याची स्पष्टता अजूनही होताना दिसत नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांनी कदाचित आपली नवी आणि स्वतंत्र टीम बनविण्याचे स्वातंत्र्य राहुल गांधी यांच्याकडून मागून घेतले असावे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करण्यासाठी राहुल गांधी यांनी तशी संधी दिली असावी; परंतु, एकंदरीत नव्या प्रभारींमुळे काँग्रेसच्या एकूण स्थितीमध्ये फार बदल होईल, अशी परिस्थिती दिसत नाही. एकंदरीत, नवी टीम बनविताना खर्गेंनी जुन्या सहकाऱ्यांकडून आपल्याला समर्थन आणि विश्वास प्राप्त व्हावा आणि त्यांच्याकडून काम करून घेता यावं, याच उद्देशाने ही टीम बनवली आहे. परंतु, काँग्रेस अंतर्गत सुप्त संघर्ष जो नेतृत्वाच्या पातळीवर राज्यनिहाय सुरू आहे, त्या संघर्षातून अजूनही काँग्रेसची सुटका झालेली नाही. काँग्रेसचे राज्यनिहाय प्रभारी आणि वेगवेगळ्या राज्यातील नेतृत्वाच्या मागे नागपूर कनेक्शन असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने या सगळ्या फेरबदलांमध्ये खूप नवी वाट चोखाळली किंवा प्रयोगशीलता आणली आहे, असे म्हणण्यात काहीही अर्थ नाही. अर्थात, स्वतः काँग्रेसने देखील तसा दावा केलेला नाही. परंतु, राहुल गांधी यांचं नेतृत्व काँग्रेसमध्ये उभे राहिल्यापासून काँग्रेस अंतर्गत जुने विरुद्ध नवे, असा जो वाद सुरू झाला आहे, त्यातून अजूनही काँग्रेसची सुटका झाली आहे, असे दिसत नाही! बहुधा, २०२४ च्या लोकसभा निवडणुका नंतर, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वतः राहुल गांधी हे साठीच्या घरात पोहोचलेले असतील. त्यामुळे, काँग्रेस मधील नव्या आणि जुन्या अशा नेतृत्वाचा वाद आपसूकच मिटलेला असेल. कारण, तोपर्यंत राहुल गांधी हे देखील काँग्रेसमध्ये ज्येष्ठांच्या पंक्तीत बसलेले असतील. यावरून असे आपल्याला म्हणता येते की, राहुल गांधी यांना काँग्रेसचे नेतृत्व पूर्णपणे बदलण्यात किंवा नव नेतृत्वात देण्यात अद्याप पावेतो अपयश आले आहे. या नव्या नियुक्त्यांनी काँग्रेसच्या शक्तीमध्ये फार मोठी भर पडेल, असं मानण्याचं काहीही कारण नाही. कारण, काळाच्या दरम्यान मागे पडलेल्या नेतृत्वालाच पुढे आणण्याचा जो प्रयोग काँग्रेस करते आहे, त्यातून काँग्रेसला कितपत यश साध्य होईल, हा तर खरा प्रश्न आहे. अर्थात, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची सध्या तरी ट्यूनिंग चांगली असल्याने पक्ष यशाच्या दिशेने जाईल, यात शंका नाही!
COMMENTS