इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा हा खेळ सुरूवातीपासूनच वादग्रस्ततेशी जोडला गेला आहे. या स्पर्धेची संकल्पना आणि प्रत्यक्ष या स्
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा हा खेळ सुरूवातीपासूनच वादग्रस्ततेशी जोडला गेला आहे. या स्पर्धेची संकल्पना आणि प्रत्यक्ष या स्पर्धेला साकार करणारा ललित मोदी हा देशा बाहेर परांगदा झाला, तेव्हाच या स्पर्धेचे विकृत स्वरूप लोकांसमोर आले होते. परंतु, लोकांच्या अल्पकाळ स्मृतींमुळे या एकूणच व्यवस्थेचे फावते. आता कालचाच प्रकार बघा दरवर्षी होणाऱ्या खेळाडूंच्या जाहीर लिलावाप्रमाणे या वर्षी देखील झाला. यात तब्बल ६५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना या लिलावात बोली लागली नाही; म्हणजे त्यांना खरेदीदार मिळाला नाही. ज्यांनी कधीकाळी आपापल्या देशाचे नाव क्रिकेटच्या खेळातून जगाच्या नकाशावर गाजवले अशा दिग्गज खेळाडूंना त्यांच्या बेस किंमतीवर देखील कोणी ढुंकूनही पाहिले नाही. मुळात, भांडवलशाहीचा चेहरा असा क्रूर असतो. तो कोणावरही दयामाया दाखवित नाही. ज्या खेळाडूंना लिलावातून बाद व्हावे लागले ते आता आपल्या बेसिक किंमती कमी करून पुन्हा लिलावाच्या बाजारात येतील. याचा अर्थ जागतिक उंचीला पोहचलेले खेळाडू आर्थिक लाभासाठी किती गुलाम मनोवृत्ती स्विकारतात याचे हे चपखल उदाहरण आहे. आयपीएल स्पर्धेच्या सुरूवातीलाच खेळाडूंच्या बाजारी लिलावावर तेव्हापासूनच सामाजिक पातळीवर आक्षेप घेतले गेले आहेत. मुळात, या स्पर्धेच्या निमित्ताने उभा राहिलेला हा बाजार जगातील कोणत्याही देशाच्या संविधान आणि कायद्याशी विसंगत आहे. माणसांचा बाजार म्हणजे गुलामांचा बाजार होय. गुलामीच्या प्रथेला जगभरातील सर्वच देशांत बंदी आहे. तरीही, आयपीएल सारखी निव्वळ भांडवलदारांचा काळा पैसा पांढरा करणारी ही स्पर्धा अक्षरशः गुलामांचा बाजार जाहीरपणे भरवते आहे, हे जगातील सर्व आधुनिक मानव समाजाची मान शरमेने खाली घालायला लावणारा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. खरेदी आली की मालकी येते. मानवेतर प्राणी निर्जीव वस्तूंच्या खरेदी आणि मालकीला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. परंतु, जेथे माणूस नावाचा घटक कोणत्याही नावावर आणि कारणास्तव खरेदी केला जात असेल तर तो गुलाम बनतो, यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. आयपीएल स्पर्धेत जे खेळाडू खरेदी केले जातात त्यांना मालकाच्या समोर अक्षरशः गुलाम म्हणून रहावे लागते. यात कोणताही देशाचा ‘रत्न’ अपवाद नाही. मालकाने खरेदी केलेल्या खेळाडूला तो फक्त जिंकण्याचे आदेश देतो. जिंकण्याच्या ईर्षेने मैदानात उतरलेल्या खेळाडूंना संध्याकाळी पराभूत परतावे लागले तर तो मालक त्यांची शब्दातून काय गत करित असेल, ही कल्पना न केलेलीच बरी.
खरेतर, दुसऱ्या महायुध्दानंतर प्राचीन समाजाच्या सर्व जंगली प्रथांना हद्दपार करण्यात आले आहे. आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने मात्र, माणसांच्या खरेदी-विक्रीचा लिलाव जो सुरू झाला आहे, तो या जागतिक कराराचा भंग आहे. जागतिक शांतता आणि सहजीवन या मूल्यांना या बाजाराने सुरूंग लावला आहे. अशा बाजाराऐवजी आयपीएल भरती स्पर्धा भरवून त्यातील खेळ पाहून खेळाडूंची निवड करण्यात यावी. ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेट संघात खेळाडूंची निवड करण्यासाठी देशांतर्गत रणजी स्पर्धा होतात. रणजी स्पर्धेतील परफाॅर्मन्स बघून क्रिकेट संघाची निवड केली जाते.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य जोपासणाऱ्या भारतात खुलेआम खेळाडू म्हणून माणसांची खरेदी-विक्री व्हावी, याला आमचा ठाम विरोध आहे. क्रिकेट खेळाला आपले सर्वस्व मानलेल्या भारतीय युवकांना नुकत्याच संपन्न झालेल्या एक दिवसीय क्रिकेट च्या जागतिक स्पर्धेत तिकिटांचा जो बाजार मांडला गेला त्यावरही आक्षेप नोंदवला होता. अपेक्षा आहे की, लवकरच खेळाडूंच्या रूपातील माणसांची ही खरेदी-विक्री आक्षेपार्ह ठरेल!
COMMENTS