श्रीगोंदा प्रतिनिधी ः कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता दुरुस्ती आणि संरक्षण भिंत बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी शासकीय ठेकेदाराकडून 40 हजार रुपया
श्रीगोंदा प्रतिनिधी ः कोकणगाव ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता दुरुस्ती आणि संरक्षण भिंत बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी शासकीय ठेकेदाराकडून 40 हजार रुपयांची लाच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये स्वीकारताना सरपंच उज्वला सतीष राजपूत आणि पती सतीष बबन राजपूत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोकणगाव ग्रामपंचायत हद्दीत रस्ता दुरुस्ती आणि संरक्षण भिंत बांधकाम अशा 4,61,568 रुपये कामाचे कॉन्ट्रॅक्ट काम शासकीय ठेकेदाराने घेतले होते. सदरील काम मुदतीत पूर्ण करून कामाचे बिल अकाउंटला जमा करणे बाबत सरपंच उज्वला सतीष राजपूत आणि पती सतीष बबन राजपूत यांना ठेकेदाराने विनंती केली असता त्यांनी एकूण बिलाच्या 10 टक्के प्रमाणे 46 हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याची तक्रार संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे 10 जुलै 2023 रोजी दिली. सदर तक्रारीचे अनुषंगाने 10 जुलै 2023 रोजी कोकणगाव ग्रामपंचायत येथे लाच मागणी पडताळणी केली असता यातील लोकसेवक सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी तक्रारदार यांचे कडे 46 हजार रुपयांची लाचची मागणी करुन सदर लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले होते. सदरील कामाचे बिल ठेकेदाराच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी सरपंच यांनी ठेकेदारास 46 हजार लाच रक्कम घेऊन बोलविले असता तडजोड करून 40 हजार रूपये रक्कम देण्याचे ठरले. सदरील तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी कोकणगाव ग्रामपंचायत येथे सापळा लावून झालेल्या कारवाई दरम्यान लोकसेवक सरपंच उज्वला सतिष रजपूत व त्यांचे पती सतिष रजपूत यांनी कोकणगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे 40 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, अहमदनगर पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार,पोना. रमेश चौधरी, पोकॉ. बाबासाहेब कराड, सचिन सुदृक, रवी निमसे, मपोना संध्या म्हस्के, राधा खेमनर, चालक दशरथ लाड यांच्या पथकाने केली असून कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ 0241- 2423677 किंवा टोल फ्रि क्रं. 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने यावेळी करण्यात आले.
COMMENTS