माहेरच्या साडीने भगिनी गहिवरल्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहेरच्या साडीने भगिनी गहिवरल्या

अहमदनगर दिवाळीत आपल्या आप्तस्वकीयांना भेटून भेटवस्तू ,फराळाचे पदार्थ, मिठाई  देण्याची परंपरा आहे.  ज्यांना भाऊ आणि माहेर असते अशा माता-भगिनींसाठी

संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा सज्ज
नेव्ही भरती नियुक्तीचे पत्र निघाले बनावट…एकास अटक
नगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक आठ दिवस बंद

अहमदनगर

दिवाळीत आपल्या आप्तस्वकीयांना भेटून भेटवस्तू ,फराळाचे पदार्थ, मिठाई  देण्याची परंपरा आहे.  ज्यांना भाऊ आणि माहेर असते अशा माता-भगिनींसाठी भाऊबीजेचा दिवस अगदी खास असतो. हमखास प्रेमाचे प्रतिक असणारे वस्त्र आणि मिठाई त्यांना परंपरेने आपल्या भावाकडून दिली जाते. परंतु ज्यांना कोणीही भाऊ अथवा नातेवाईक नसतो, अशांसाठी दीपोत्सव दु:ख आणि निराशेचे शोक पर्व असते. अशा वंचित माता-भगिनींना सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजींच्या प्रेरणा आणि प्रयत्नातून आज माहेरची साडी भाऊबीज म्हणून मिळाली.

नगर जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या सा-या माता-भगिनी ही भाऊबीज मिळाल्यावर  अक्षरशः गहिवरल्या. ज्यांच्याशी  आपले रक्ताचे नाते नाही किंवा ओळखही नाही असे भाऊ नवे नाते जोडण्यासाठी पुढे आल्याने कोणालाच अश्रू आवरले नाहीत. अनौपचारिक पद्धतीने भावपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित भगिनीतर्फे रंजना रणनवरे, जया जोगदंड, मीना पाठक आदींनी यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात महिलांच्या भावना व्यक्त केल्या. आपल्याला मिळालेली माहेर ची साडी म्हणजे केवळ वस्त्र नसून जगण्याची उमेद आणि नवी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले. 

मागील १६ वर्षापासून औटी गुरुजी माहेरच्या साडीचे अभियान दिवाळीत राबवितात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सूचना माहिती अधिकारी गजानन नकासकर, नायब तहसीलदार माधव गायकवाड तर विशेष अतिथी म्हणून बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, सदस्य प्रवीण मुत्याल,   डापकु विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव,   भूषण साडीजचे संचालक राधेश्याम बूब,  स्नेहालयचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप,  स्नेहालय अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर  आदी व्यासपीठावर उपस्थित होते. स्नेहालय संस्थेतील तसेच ईतर कुटुंबाने नाकारलेल्या महिलांसाठी त्यांचे काही आजी – माजी आणि मित्र यांच्याकडून ऐच्छिक मदत घेऊन गुरुजी त्याच्या साड्या आणतात. बाजारातील सुमारे ५०० रुपये सरासरी किमतीच्या साड्या विकत घेवून त्या भाऊबीजेच्या निमित्ताने अशा भगिनींना दिल्या जातात. माहेरची साडी या उपक्रमात अभंग प्रतिष्ठान, देहू पुणे येथील मा. किरीटी मोरे, डॉ. प्रकाश शेठ, विकास कंद, सचिन साळुंखे, सुरेश गाडे, अजिंक्य साकोरे, विक्रम भोईटे,  मा. निर्मला जगदीश बलसेकर, मा. संदेश झोडगे, मा. निलेश गुंजाळ, मा. प्रविण बोरा, मा. राजू कपाटे महाराज,  मा. सोमेश भालसिंग,  भूषण साडीज  आदी या ”भगिनींचे भाऊ” उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक बाल कल्याण समितीचे सदस्य प्रवीण मुत्याल, सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिपक बुरम  यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक बुरम, आकाश काळे, प्रविण बुरम, अशोक चिंधे, संजय जिंदम, फिरोज पठाण, अंबादास शिंदे, मझहर खान, सविता करांडे, आशा जाधव, जयाताई जोगदंड आदींनी प्रयत्न केले.

COMMENTS