आजकाल आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याचा नवा ट्रेंड रुजतांना दिसून येत आहे. या जाहिरातीमध्ये जे दावे करण्यात येतात, ते प्रत्यक्षात असतातच असे नव
आजकाल आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याचा नवा ट्रेंड रुजतांना दिसून येत आहे. या जाहिरातीमध्ये जे दावे करण्यात येतात, ते प्रत्यक्षात असतातच असे नव्हे, ग्राहकांची फसवणूक होऊनही ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतो, कारण आपण जे प्रॉडक्ट घेतले, त्यासाठी आपण जी 100-200 किंवा हजार रुपये किंमत मोजतो. मात्र या प्रॉडक्टमध्ये जे दावे करण्यात आले, त्याचा फायदा झाला नाही, यासाठी न्यायालयात धाव घेण्याशिवाय सामान्य ग्राहकांना पर्याय नाही. शिवाय न्यायालयात धाव घेणे म्हणजे, मानसिक त्रास, शिवाय आर्थिक हानी, यामुळे सर्वसामान्य ग्राहक तक्रार करत नाही. त्यामुळे या कंपन्यांचे चांगलेच फावते. मात्र मंगळवारीच सर्वोच्च न्यायालयाने पंतजली आयुर्वेद कंपनीला खडसावले आहे. या कंपनीने आयुर्वेदिक औषधाने अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केल्याप्रकरणी खडसावले. तसेच दिशाभूल करणारे फसवे दावे बंद न केल्यास अशा प्रत्येक उत्पादनामागे एक कोटी रुपयांचा दंड ठोठावू, असा इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे ही कंपनी योगगुरू बाबा रामदेव यांची आहे. बाबा रामदेव यांच्या पंतजली कंपनीने अनेक रोगांच्या समस्यांवर अनेक औषधे बाजारात आणले आहेत. त्याचप्रकारे या उत्पादनाच्या सर्रास जाहीराती करण्यात येतात, त्यात अनेक दावे करण्यात येतात. त्यामुळे या कंपनीचा टर्नओव्हर मोठा आहे. पंतजलीच नव्हे तर अनेक कंपन्या आपल्या उत्पादनाच्या जाहिराती करतांना आढळून येतात, शिवाय या जाहिरातीमधील दाव्याप्रमाणे फायदे ग्राहकांना मिळत नाही, हे वास्तव आहे. आजकाल जाहिरातींच्या माध्यमातून होणारी ग्राहकांची फसवणूक ही फार घातक ठरत आहे. काळेपणा दूर करण्यासाठी व आपला चेहरा गोरापान दिसण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा साबण वापरा, लांब व भरपूर दाट केसांसाठी हे विशिष्ट प्रकारचे तेल वापरा. आपले दात मजबूत राहण्यासाठी हीच टूथपेस्ट वापरा, हे विशिष्ट प्रकारचे रत्न तुम्ही तुमच्यासोबत बाळगलेत तर तुम्हाला महिना भरात धनप्राप्ती होईल. अश्या प्रकारे जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. काही वेळेला तर जाहिरातींना खरे मानून युवक विविध औषधांचे सेवन करतात. काही वेळेला जाहिरातीच्या विळख्यात सापडलेल्या या युवकांचे शारीरिक नुकसान होतेच, पण त्यांना जबर मानसिक धक्काही बसतो. यासोबतच जाहिराती करण्यासाठी सर्रास सेलिब्रेटी, क्रिकेटपटू यांचा वापर केला जातो. त्या जाहिरातीपोटी सेलिबे्रटींना मोठ्या रकमा मिळतात, त्याचा त्या उत्पादनांच्या विक्रीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे ब्रँडेड वस्तूंचे उत्पादन करणार्या अनेक कंपन्या सेलिब्रेटिंद्वारे आपल्या उत्पादनाची जाहिरात करतात. मात्र ती जाहिरात फसवी असेल तर सेलिब्रेटिंवर काय कारवाई होणार याबाबत अनभिज्ञता आहे. कारण 2019 मध्ये करण्यात आलेल्या नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे या कायद्यात देखील सेलिब्रिटींना अभय मिळण्याची शक्यता आहे. फसवी जाहिरात करणार्या सेलिब्रिटीला ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जबाबदार धरले जाईल, ही बाब कायदा प्रस्तावित असताना नमूद करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कायदा लागू झाल्यानंतर त्यात सेलिब्रिटिंबाबत उल्लेख करण्यात आलेला नाही. या पूर्वीच्या कायद्यात देखील अशी तरतूद नव्हती. फसवी जाहिरात केली तर दोषींना दोन वर्ष तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंड केला जाणार आहे. मात्र अशी फसवणूक करणार्यांमध्ये नेमके कोणाला जबाबदार धरले जाईल. याबाबत सविस्तर माहिती कायद्यात देण्यात आलेली नाही. त्या सेलिब्रेटी सर्रास फसव्या जाहिराती करतांना दिसून येतात.
COMMENTS