कर्जत : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर कर्जत तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड
कर्जत : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर कर्जत तालुक्यातील मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. निवडून आल्यानंतर साडेचार वर्षात ते अपवादानेच मतदारसंघात दिसले. निवडणुकीपूर्वी सामाजिकतेचा बुरखा घेत वेगवेगळे फंडे वापरत जनतेला तात्पुरता दिलासा देण्याचे काम त्यांच्या यंत्रणेने केले. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही महिन्यातच जनसेवेच्या या योजना बंद करण्यात आल्या. त्यामुळे वेगवेगळी आमिषे दाखवून मतदारांना भुलवायचे आणि निवडणूक जिंकायची, हाच का ’विखे पॅटर्न’ हा प्रश्न आता येथील मतदारांना पडला आहे.
कुठल्याही लोकांमध्ये नाविन्यतेचे आकर्षण असते. आतापर्यंत जे अनुभवले नाही ते अनुभवास येवू लागले की कुतूहलापोटी लोक त्याला बळी पडतात. डॉ. सुजय विखे यांच्याबाबत नेमके तसेच घडले. 2019 ची लोकसभा अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय डॉ. विखे यांनी घेतला आणि मतदारसंघाची चाचपणी सुरु केली. सुरुवातीला त्यांच्या उत्तरेतील विविध संस्थांमधील कर्मचार्यांचे मतदारसंघातील गावागावात येणे- जाणे सुरु झाले. दरम्यानच्या काळात त्यांच्याकडून मतदारांची सार्वजनिक तसेच वैयक्तिक माहिती संकलित करून जनतेशी वैयक्तिक संपर्क सुरु झाला. त्यानंतर विविध गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे सुरु झाली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच आपल्या गावात येवून कोणी स्वखर्चाने आरोग्य सेवा देत आहे, याचे लोकांना अप्रूप आणि कुतूहल होते. आवश्यक असलेली सर्व साधनसामग्री सोबत घेऊन नेटकेपणाने होत असलेल्या शिबिरांच्या आयोजनाने मतदारसंघातील जनतेवर विखे यांचा मोठा प्रभाव पडला. शिबिरांच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सुजय विखे यांची जोरदार भाषणे होत. मात्र राजकीय विषय त्यांच्याकडून टाळले जात होते. आरोग्याबरोबरच लोकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी विखे कुटुंब कटिबध्द असल्याचे भाष्य ते सर्वत्र करीत होते. आजोबांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याची ग्वाही ते देत होते. त्याचा मोठा प्रभाव जनतेवर पडला. निवडणुकीपूर्वीच मिळू लागलेल्या विविध सुविधा, वारंवार होत असलेल्या गाठीभेटी, त्यांच्या यंत्रणेकडून जनतेच्या कामाचा होत असलेला पाठपुरावा, यामुळे मतदारसंघात विखे यांची विश्वासार्हता वाढत गेली. त्यातच डॉ. सुजय विखे यांच्या संवादातील कमालीची विनम्रता लोकांवर वेगळा प्रभाव निर्माण करत गेली. साधे राहणीमान, संवादातील ओघवत्या बोली भाषेचा वापर, दोन्ही भुवयांच्या मध्यावर हात जोडून लोकांना अभिवादन करण्याची त्यांची अनोखी पद्धती नम्रतेचे दर्शन घडवत होती. एकूणच त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव मतदारसंघावर पडला. भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक यंत्रणेपेक्षा त्यांनी स्वत:च्या देखरेखीखाली तयार केलेल्या यंत्रणेने मोठे परिश्रम घेतले. त्याचाच परिणाम म्हणून मोठ्या मताधिक्याने त्यांनी निवडणूक जिंकली आणि डॉ. सुजय विखे हे दक्षिणेचे खासदार झाले.
स्वतःचे सेल्फ प्रमोशन करण्यातच हस्तक व्यस्त – खासदार झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी काही महिने जनतेशी संवाद ठेवला. त्यांची यंत्रणाही बर्यापैकी सक्रिय राहिली. दरम्यानच्या काळात विखे यांचे हस्तक असलेल्या नेतेमंडळींनी हारतुर्यांसह विजयाचे श्रेय घेतले. विखे यांच्या अनेक पिढ्यांना साथ देत आम्ही त्यांची विचारधारा अंगिकारल्याचे ही मंडळी सांगत होती. पक्षापेक्षा आम्ही कुटुंबाशी निष्ठा ठेवतो, असे म्हणत या नेत्यांनी स्वत:चे सेल्फ प्रमोशन करुन घेतले. आपण कसे विखेंचे ’हनुमान’ आहोत, हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला. खासदार साहेबांपर्यंत पोहोचण्याचा आपणच एकमेव सुवर्णमार्ग असल्याचे ते भाषणांमधून अधोरेखित करत होते. पुढच्या काळात खा. सुजय विखे हे आपल्या दोन- चार हनुमानांची नावे भाषणात घेवून विखे कुटुंबावर निष्ठा ठेवणार्यांना आम्ही फळ देत असतो, असा संदेश देत. त्यातून पक्षापेक्षाही आमच्याशी एकनिष्ठ राहणार्यांनाच उमेदवार्या, पदे आणि एकूणच मोठेपणा दिला जात असल्याचा संदेश ते कायम देत असल्याने त्यांचे प्रचारक त्याला ’विखे पॅटर्न’ असे नाव देतात.
COMMENTS