कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्या पाण्याची आवक वाढत चालली आहे.
पाटण / प्रतिनिधी : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून सततच्या पावसामुळे कोयना धरणात येणार्या पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात होणारी पाण्याची आवक नियंत्रणात ठेवण्यासाठी काल शुक्रवारी सकाळी 11 वाजता धरणाच्या विद्युतगृहातून सुमारे 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला.
दरम्यान, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे व सततच्या पावसामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरण व्यवस्थापनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
बुधवारी रात्रीपासून पाटण तालुक्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणात येणारे पाणी वाढत असून प्रति सेकंद सरासरी 24 हजार 275 क्यूसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. तर काल सकाळीपर्यंत धरणातील पाणीसाठा 35.46 टिएमसी झाला होता.
काल सकाळी 11 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे सर्वाधिक 329 मिलीमीटर इतका विक्रमी पावसाची नोंद झाली आहे तर, कोयना 32, नवजा 21, महाबळेश्वर 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
COMMENTS