बीजिंग/वृत्तसंस्था ः भारताच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये सध्या बरीच राजकीय उलथापालथ सुरू असून, चीनचे संरक्षणमंत्रीच बेपत्ता असल्याचे समोर आल्यामुळ
बीजिंग/वृत्तसंस्था ः भारताच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये सध्या बरीच राजकीय उलथापालथ सुरू असून, चीनचे संरक्षणमंत्रीच बेपत्ता असल्याचे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्री ली शांग फू हे बेपत्ता झाल्यानंतर शी जिनपिंग सरकारने संरक्षण मंत्रालयातील अनेक बड्या अधिकार्यांना अटक केली आहे.
शी जिनपिंग यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, जिनपिंग यांचा आपल्या विरोधकांवर दबाव आणण्याचाही ’कट’ असू शकतो, असेही म्हटले जात आहे. जिनपिंग सरकारने संरक्षण मंत्रालयातील ज्या बड्या अधिकार्यांना अटक केली आहे, त्यात संरक्षण विभागांचे प्रमुख देखील असल्याची माहिती आहे. चीनमधून अतिमहत्वाच्या व्यक्ती बेपत्ता होण्याची या वर्षातील ही दुसरी घटना आहे. याआधी चीनचे परराष्ट्रमंत्री सुद्धा अचानक गायब झाले होते. चीनच्या अंतर्गत राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या दाव्यानुसार, या घटनांच्या मागे शी जिनपिंग यांचा हात असू शकतो. भविष्यात चीन सरकारसाठी धोकादायक ठरू शकतात अशा नीकटवर्तीय व्यक्तींचा अडथळा अशा प्रकारे दूर करण्याची त्यांची रणनीती सगळ्यांनाच माहीत आहे, असाही दावा केला जात आहे. ली शांग फू यांना मागील महिन्यात शेवटचे बघितले गेले होते. चीनची राजधानी बीजिंगमध्ये चीन-आफ्रिका फोरमच्या व्यासपीठावर त्यांनी संबोधित केले होते. त्यानंतर ली यांचा काहीही थांगपत्ता नाही. ली यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप असल्याचे सांगितले जाते. संरक्षण मंत्री होण्याआधी ते सैनिक उपकरण विकास विभागात मंत्री होते. संरक्षण मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली होती. त्यात अनेक नियमांना तिलांजली दिल्याचे समोर आले होते. संरक्षण मंत्री बेपत्ता झाल्यानंतर जिनपिंग सरकारने संरक्षण मंत्रालयातील अनेक बड्या अधिकार्यांना अटक केल्याचे वृत्त आहे. त्यात चायना नॉर्थ इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ली शिकवान, चायना एअरोस्पेस सायन्स अॅण्ड इंडस्ट्री कॉर्पोरेशनचे चेअरमन युआन जे, चायना नॉर्थ इंडस्ट्री ग्रुप कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक चेन गुआओयिंग, चायना एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशनचे चेअरमन तान रुइसोंग आदी आहेत
COMMENTS