मुंबई प्रतिनिधी -: केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर लक
मुंबई प्रतिनिधी -: केईएम रुग्णालयाच्या सहा वार्डचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामावर लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज उशिरा केईएम रुग्णालयास अचानक भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. केईएम ९७ वर्षे जुने रुग्णालय आहे. या रुग्णालयातील सुविधांचे अद्ययावत करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केईएम रुग्णालयास अचानक भेट देऊन थेट रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध वार्ड आणि तेथील सुविधांबाबतही त्यांनी माहिती घेतली. भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, रुग्णालयातील सहा वार्डचे काम येत्या दोन दिवसांत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जेणेकरून याठिकाणी आणखी ४०० ते ४५० रुग्णांवर उपचार करता येणार आहेत. काही रुग्णांनी आर्थिक अडचणीची माहिती दिली.त्यावर पैस्याअभावी कुणाचेही उपचार थांबणार नाहीत याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे. याठिकाणी रुग्णांना दर्जेदार दूध पुरवण्यात यावे याबाबतही सूचना देण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केईएम येत्या दोन-तीन वर्षात शंभर वर्षे पूर्ण करत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णसेवा, येथील सुविधा आणखी आधुनिक करण्याच्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. तसेच रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळत असलेल्या उपचारांची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
COMMENTS