Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाखाची लाच घेताना सहाय्यक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

सातारा / प्रतिनिधी : अवैध दारू वाहतूक प्रकरणात मदत करण्यासाठी तसेच यानंतर कोणताही त्रास होणार नाही. याची हमी देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेतल

धक्कादायक ! तरुणाच्या गुप्तांगावर मेणबत्तीचे चटके देत अनैसर्गिक अत्याचार.
छत्रपती शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन
शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

सातारा / प्रतिनिधी : अवैध दारू वाहतूक प्रकरणात मदत करण्यासाठी तसेच यानंतर कोणताही त्रास होणार नाही. याची हमी देण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार बापूसाहेब नारायण जाधव (वय 54) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात औंध पोलिस ठाण्याचा कारभारी सपोनि दत्तात्रय परशुराम दराडे यानेही लाचेची मागणी केली होती. दोघांविरोधात औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एकाचवेळी दोन पोलीस अधिकारी पकडले गेल्याने सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कारवाईच्या भीतीने सपोनि दराडे पसार झाला आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे 42 वर्षांचे असून, त्यांचे परमिट रूम बीअर बार आहे. दारूची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारवाई प्रकरणात तक्रारदार हे सपोनि दत्तात्रय दराडे व सहायक फौजदार बापू जाधव याला भेटले. यावेळी दोन्ही संशयितांनी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच इथून पुढे त्यांच्या व्यवसायात कोणताही त्रास न देण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. लाचेची मागणी केल्याने तक्रारदार बारमालक यांनी सातारा एसीबीमध्ये तक्रार दिली. पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या पडताळणीत दराडे व जाधव या दोघांनी पैशांची मागणी केल्याचे लक्षात आले. लाचेची रक्कम शुक्रवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा रचला. लाचेची रक्कम सहाय्यक फौजदार जाधव याच्याकडे देण्याचे ठरले. औंध येथील जुन्या एसटी स्टॅण्ड परिसरातील पटांगणामध्ये जाधव याने दुपारी लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईची माहिती औंधसह परिसरात पसरल्यानंतर खळबळ उडाली.
संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर एसीबीने औंधचे प्रभारी दत्तात्रय दराडे याच्याकडे मोर्चा वळवला असता ते नाट्यमयरित्या गायब होण्यात यशस्वी झाले. एसीबीने कारवाईला सुरुवात केल्यानंतर जिल्हा पोलीस दलात याची माहिती वार्‍यासारखी पसरली. एसीबीने पंचनामा करुन रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक उज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निलेश चव्हाण, तुषार भोसले, निलेश येवले यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सहाय्यक फौजदार बापू जाधव याची फिरून-फिरून औंध पोलीस ठाण्यात अनेकदा बदली होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सुमारे 3 ते 4 वेळा तिथेच त्याने बदली केली असून औंध परिसरात त्याने चांगलेच बस्तान बसवले असल्याची चर्चा आहे. पोलीस कमी आणि ‘दाजी’ म्हणून परिचित आहे. पोलीस ठाण्यापर्यंत भानगड येणार असल्यास पहिल्यांदा दाजीला भेटा आणि टेन्शन विसरा, असाच काहीसा दरारा होता. वारंवार औंध पोलीस ठाण्यांत बदली होण्यासाठी वरिष्ठांची दाजीने चांगलीच मर्जी राखली असल्याने इतर कर्मचार्‍यांच्या बीटांमध्ये नेहमीच ढवळा-ढवळ होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र शुक्रवारी दुपारी ‘दाजी’ सापळ्यात रंगेहात अडकल्यानंतर औंधमध्ये खुशीचे वातावरण तयार झाले होते.

COMMENTS