शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्तपदी वर्णी लागल्याचे ढोल मागील दोन दिवसांपासून सोशल मिडियातून वाजत असले तरी या सर्व उत्साहींचा व त्यांच्या समर्थकांचे फुगे बुधवारी फुटले.
अहमदनगर/प्रतिनिधी : शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्तपदी वर्णी लागल्याचे ढोल मागील दोन दिवसांपासून सोशल मिडियातून वाजत असले तरी या सर्व उत्साहींचा व त्यांच्या समर्थकांचे फुगे बुधवारी फुटले. शिर्डी संस्थानची विश्वस्त मंडळ निवड दोन आठवडे लांबणीवर गेली आहे. अर्थात राज्य सरकारनेच ही मुदतवाढ मागितली होती. त्यामुळे विश्वस्त झाल्याच्या आनंदात फटाके फोडणारांच्या आशेवर पाणी पडले आहे.
शिर्डी संस्थानवर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असतानाच, मंगळवारी रात्री कोपरगावचे राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार आशुतोष काळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर झाल्याच्या व त्यापाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कोट्यातून कोणा-कोणाची संस्थानच्या विश्वस्तपदी वर्णी लागल्याच्या पोस्ट सोशल मिडियातून फिरत होत्या. तशा बातम्याही बुधवारी प्रसिद्धीमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्या. मात्र, बुधवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू असताना याचिकाकर्त्यांच्या वकिलाने अद्याप निवड झालेली नसताना काही नेत्यांनी बॅनरबाजी व फटाके फोडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, या निवडीबाबत कार्यवाही अंतिम टप्यात असून आगामी पंधरा दिवसात न्यायालयाला ती सुपूर्द केली जाईल असे आश्वासन देऊन राज्य सरकारने न्यायालयाकडे पंधरा दिवसांची मुदतवाढ मागून घेतली असून न्यायालयाने ती दिली असल्याची माहिती अॅड. अजिंक्य काळे यांनी दिली आहे. याचिकाकर्ते यांच्यावतीने न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले कि, काही राजकीय व्यक्तींची नावे सामाजिक माध्यमांवर विश्वस्त म्हणून निवड झाल्याचे फिरत आहे. त्यावर मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी स्पष्ट केले की, विश्वस्त मंडळ नेमण्यासंदर्भात बैठक झाली असून, विश्वस्त मंडळ नियुक्तीसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यासाठी अंतिम 2 आठवड्याची मुदतवाढ मागितली. त्यावर उच्च न्यायायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला व न्यायमूर्ती एम.जी.सेवलीकर यांनी सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीची नोंद घेत साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीसंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यासाठी राज्य शासनास 2 आठवड्याची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रज्ञा तळेकर व अजिंक्य काळे यांनी काम पाहिले तर शासनाच्यावतीने अॅड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी 5 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
समर्थकांचा झाला भ्रमनिरास
शिर्डी साई संस्थान आणि पंढरपूर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अधिकृतरित्या या नावांवर शिक्कामोर्तब न झाल्यामुळे ही नावे जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, संस्थानचे विश्वस्तपद,अध्यक्षपदाच्या संदर्भात निर्णय झाला असल्याच्या बातम्या विविध वृत्त संस्थांनी प्रसिद्ध केल्या होत्या त्यात अध्यक्षपदी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे नेते नेर्लेकर तसेच विश्वस्तपदी डॉ. एकनाथ गोंदकर, संदीप वर्पे,संग्राम कोते,अनुराधा आदिक, अजित कदम, पांडुरंग अभंग, सुरेश वाबळे आदी सोळा विश्वस्तांची यादी अनधिकृत जाहीर झाली होती. पण, त्याला सरकारी पातळीवर दुजोरा मिळाला नव्हता. तरीही इच्छुकांच्या समर्थकांनी फटाके उडवले तर काहींनी शहरात बॅनर लावले होते. पण अधिकृत निवडी झाल्या नसल्याचे स्पष्ट झाल्यावर अनेकांचा भ्रमनिरास झाला.
COMMENTS