कराड/प्रतिनिधी ः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता काँगे्रस फुटणार असल्याचा मोठा दावा शिंदे गटाचे आमदारांनी केला होता.
कराड/प्रतिनिधी ः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता काँगे्रस फुटणार असल्याचा मोठा दावा शिंदे गटाचे आमदारांनी केला होता. मात्र काँगे्रसचे आमदार फुटण्याची सुतराम शक्यता नसून, काँगे्रसमधील आमदारांमध्ये नाराजीचा कोणताही सूर नसल्याची स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी दिली. कराडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.भाजपच्या गोटातून अफवा पसरवण्याचे काम सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शिवसेनेबाबत जे घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडले आहे. त्यात नेते सोडून गेले असले तरी जनता जाणार नाही, याचा प्रत्यय लवकरच येईल. पक्षफुटीचे राजकारण मी अनेकदा पाहिलेले आहे. छोट्या-मोठ्या प्रमाणात लोक येतात अन् जातातही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. भाजपमध्ये यापूर्वी विविध पक्षांमधून गेलेले लोक म्हणजे लोकाची गर्दी आहे. या गर्दीमध्ये कोणाला काय पद मिळणार? हा प्रश्नच आहे. राज्य सरकारला साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्तीही रखडलेली आहे. हे सारे वाटते तितके सोपे नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. आजची राजकीय स्थिती पाहता सर्वसामान्यांचा स्वतःवरच विश्वास राहिला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगत केवळ नेत्यांनाच दोष देऊन चालणार नाही. त्यांना निवडून कोणी दिले? अमिषांना बळी कोण पडले? हेही पहाणे महत्वाचे असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले. भाजपला हुकूमशाही प्रस्थापित करायची असल्याचे मी सांगत आलो आहे. अमित शहा यांनी अनेकदा काँग्रेसमुक्त भारत म्हणणे म्हणजे त्यांना विरोधी पक्षच नको आहे. छोटे पक्षही नको आहेत. केवळ भाजपचेच सरकार आणि हुकूमशाही हवी आहे. त्यामुळे देशाला हुकुमशाहीच्या दिशेने नेले जात आहे. हे होऊन द्यायचे की नाही ते लोकांच्याच हातात असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
COMMENTS