अहमदनगर/प्रतिनिधी ः दोन दिवसांपूर्वीच बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत तब्बल 25 प्रवाशांचा ह
अहमदनगर/प्रतिनिधी ः दोन दिवसांपूर्वीच बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर ट्रॅव्हल्सला लागलेल्या आगीत तब्बल 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असतांना, रविवारी पुन्हा एकदा अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून, यात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणारी कार गाडी डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याचे समोर येत आहे. या अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. नांदेडहून मुंबईकडे निघालेल्या गाडीला अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, बुलढाणा बस अपघाताची घटना ताजी असताना पुन्हा समृद्धी महामार्गावर अपघात घडल्याने रस्ते अपघात आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. शनिवारी समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळ झालेल्या भीषण बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बस रस्त्यावरील पोलला धडकून उलटली व बसच्या डिझेल टाकीचा स्फोट झाला. यामध्ये 25 प्रवासी जिवंत जळाले. सर्व प्रवासी नागपूर, वर्धा व बुलढाण्यातील होते. या बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. त्यातील 8 प्रवासी सुखरूप बचावले आहेत. यामध्ये चालक व वाहकाचा समावेश आहेत. तसेच शुक्रवारी पहाटे समृद्धी महामार्गावर कोपरगावात भीषण अपघात झाला होता. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील अपघातात तीन जण ठार तर 5 जखमी झाले. क्रूझर जीप आणि आयशरच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे कोपरगाव हा समृद्धी महामार्गावरील अपघातांचा स्पॉट ठरतांना दिसून येत आहे.
COMMENTS