महाराष्ट्राची अव्वल संस्कृती म्हणून जगामध्ये कोणत्याही गोष्टीचा सर्वप्रथम उल्लेख करण्याचा भाग निर्माण झाला तर, त्यात पंढरपूरचा विठोबा आणि विठोबाच
महाराष्ट्राची अव्वल संस्कृती म्हणून जगामध्ये कोणत्याही गोष्टीचा सर्वप्रथम उल्लेख करण्याचा भाग निर्माण झाला तर, त्यात पंढरपूरचा विठोबा आणि विठोबाचा वारकरी संप्रदाय, हे अग्रस्थानी राहतील यात शंका नाही. महाराष्ट्रात ४०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेली वारकरी संप्रदायाची दिंडी, हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असून या सांस्कृतिक दिंडीला महाराष्ट्रात सर्वोत्तम स्थान आहे! त्यामुळेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पंढरपूरच्या विठोबाचे सर्वप्रथम पूजा करण्याचा मान मिळतो. महाराष्ट्राचा बहुजन समाज हा पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी आसुसलेला असतो. म्हणून महाराष्ट्राच्या दाही दिशातून महाराष्ट्राचा बहुजन समाज वारकरी म्हणून आपल्या गावोगावीच्या समतेच्या दिंड्या घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालायला लागतो. समता, सत्य, अहिंसा या त्रयी सूत्रांवर आधारलेला वारकरी संप्रदाय, या देशाच्या समतावादी मूल्यवस्थेची पाठ राखण करणाराच नव्हे, तर समतावादी मूल्य व्यवस्था स्थापन करण्यासाठी आपल्या भक्तिमार्गाचा अवलंब करणारा संप्रदाय आहे. अशा या वारकरी संप्रदायावर काल महाराष्ट्रात पोलिसांचा लाठीमार झाला. ही बाब जगाच्या कानाकोपऱ्यात एका क्षणात पोहोचली. लाठीमार करणाऱ्या प्रशासन – शासनाचा विरोध सर्वत्र नोंदवला गेला. याच पंढरपूरच्या विठोबाची पूजा करण्यासाठी एकेकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ खडसे गेले होते. त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी असावा, हे वक्तव्य केलं आणि एकनाथ खडसे कायमचे राजकीय विजनवासात गेल्यासारखे झाले. ही आठवण आम्ही यासाठी या ठिकाणी उदृत केली की, काल जो लाठीमार झाला तो संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथे प्रवेशादरम्यान झाला. या ठिकाणी प्रवेशासाठी पास दिले गेल्याचे सांगितले जात असले तरी, ज्या वारकऱ्यांना अडवण्यात आले आहे, ते वारकरी बहुजन समाजातील आहेत. त्या वारकऱ्यांना नेमके का अडवले, हा संघर्ष उलगडणे ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. मुळातच पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर हे वैदिक आणि अवैदिक या संघर्षात गेल्या काही काळापासून अडकले होते. पंढरपूर मंदिर हे उत्पात आणि बडवे यांच्यापासून मुक्त केल्यानंतर, या वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने नंतरच्या काळात अनेक वाद उपस्थित करण्यात आले आहेत. काल आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यात प्रवेशादरम्यान रोखण्यात आलेल्या वारकरी संप्रदायाला याच भावनेतून रोखण्यात आले आहे काय, हा आमचा या ठिकाणी मूलभूत प्रश्न आहे. बऱ्याच वेळा अलीकडच्या काळामध्ये एखादा घटना प्रसंग जाणीवपूर्वक घडवला जातो आणि त्यातून जनमानसात एक चर्चा घडवून आणली जाते आणि एखाद्या संघटना विशेष ला अभिप्रेत असलेले इप्सीत साध्य केले जाते, ही गेल्या काही काळापासून सुरू असलेली मोडस ऑपरेंडी आहे. त्याचाच हा भाग आहे का, हे देखील या निमित्ताने शोधणे गरजेचे आहे. वारकरी संप्रदायातील वारकरी हे देहू या ठिकाणीही मोठी गर्दी करतात; परंतु, त्या ठिकाणी असा विवाद उभा राहिला नाही; किंवा पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनावेळीही सगळा महाराष्ट्र त्या ठिकाणी सामावून गेलेला असतो. त्यावेळी देखील असा वाद होत नाही. आळंदी येथे हा वाद नेमका का आणि कसा उद्भवला, हे खरे तर महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांची एक समिती गठित करून त्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायला हवी. वारकरी संप्रदाय हा खेड्यापाड्यातून बहुजन समाजात, कष्टकरी समाजात उस्फूर्तपणे निर्माण झालेला प्रवाह आहे. यासाठी कोणत्या स्कूल किंवा इन्स्टिट्यूट यांची कधी गरज भासली नाही. परंतु, अलीकडच्या काळात वारकरी निर्माण करणाऱ्या इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे अशा इन्स्टिट्यूट चा हेतू आणि उद्देश आणि त्यांचे कार्य यावर देखील संशोधन होण्याची गरज आहे! कारण, वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे. या भक्ती संप्रदायात उत्स्फूर्तता ही अधिक महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मकांड पद्धतीने वारकरी घडवता येत नाही. परंतु, अलीकडच्या काळामध्ये उभ्या राहणाऱ्या इन्स्टिट्यूट नेमक्या काय साध्य करत आहेत, हा देखील या निमित्ताने प्रश्न उभा राहिला आहे.
COMMENTS