काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती उभी राहणे अशक्य  ; शरद पवार यांचे मत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती उभी राहणे अशक्य ; शरद पवार यांचे मत

नवीदिल्लीची बैठक केवळ राजकीय विषयांवर नाही, तर देशातील विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी होती, असे स्पष्ट करून देशात काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती उभी राहण अशक्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

बेकायदेशीर काम बंद…मनपा कापणार कर्मचार्‍यांचा पगार
डॉ.ज्योतीताई मेटे यांचा सत्कार संपन्न
वर्षभरात 25 हजार किमीचे महामार्ग बांधणार

पुणे/प्रतिनिधी : नवीदिल्लीची बैठक केवळ राजकीय विषयांवर नाही, तर देशातील विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी होती, असे स्पष्ट करून देशात काँग्रेसशिवाय पर्यायी शक्ती उभी राहण अशक्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी राष्ट्रवादी भवनाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. 

    ते म्हणाले, की आघाडी म्हणून आम्ही आत्ता बसलो नाही; पण पर्यायी शक्ती उभी करायची असेल तर ती काँग्रेसला बरोबर घेऊनच करण्याची गरज आहे, असे माझे मत आहे. मी त्या बैठकीतही ते मांडले. आघाडीचा चेहरा कोण असावा, यावर सध्या आम्ही चर्चा केलेली नाही; पण मला वाटती सामूहिक नेतृत्व हे सूत्र पुढे ठेवून आम्हाला पुढे जावे लागेल. सचिन वाझे याने केलेल्या आरोपांवरुन अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याच ठराव भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबत विचारले असता, ठराव करून चौकशीची मागणी करण्याची ही पहिलीच घटना आहे. चंद्रकांत पाटील हे मोठे कर्तृत्वान गृहस्थ आहेत. यापूर्वी कधी झाल्या नाहीत, त्या गोष्टी करण्यात त्यांचा लौकीक आहे, त्यांनी पुढाकार घेऊन असे काही केले तर आश्‍चर्य नाही. चौकशी यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, त्यांचे स्वागत आमचे सर्व सहकारी करतील, अशा शब्दात पवार यांनी भाजपच्या ठरावाची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांनी आपला स्वबळाचा नारा सुरूच ठेवला आहे. त्यावर बोलताना प्रत्येक पक्षाला संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. आमची काहीच तक्रार नाही, कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी आम्ही सर्व बोलत असतो, काँग्रेसचाही तो अधिकार आहे, असे पवार म्हणाले. टाटा रुग्णालयाला म्हाडाच्या सदनिका देण्याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या घडामोडींवरही पवार यांनी भाष्य केले. त्याबाबत पर्यायी व्यवस्था झाली आहे. त्याची काही अडचण नाही. टाटा हॉस्पिटल देशातील एक नंबरचे कॅन्सर रुग्णालय आहे. तिथे राज्यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून नागरिक येतात. जितेंद्र आव्हाडांना तिथल्या डॉक्टरांनी नातेवाइकांच्या राहण्याबाबत प्रश्‍न मांडला होता. स्थानिक आमदारांनी तक्रार केल्याने मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली; पण नंतर लगेचच दुसरीकडे जागा दिली, त्यामुळे प्रश्‍न सुटला असल्याचे पवार म्हणाले.

असले उद्योग मी फार पूर्वीच केले!

या नव्या आघाडीचे शरद पवार नेतृत्व करणार का? या प्रश्‍नावर उत्तर देताना पवार मिश्कीलपणे म्हणाले, की शरद पवारांनी फार वर्षे असले उद्योग केले आहेत. त्यामुळे सध्या हे नको. त्यांना मदत करणे, मार्गदर्शन करणे, त्यांना शक्ती देणे, त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हीच माझी भूमिका असेल. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनतेला काही पर्याय द्यावा अशी लोकांमध्ये भावना आहे. ही लोकेच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. ती जबाबदारी आम्हाला निश्‍चित पूर्ण करावी लागेल.

मराठा आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका घ्यावी

मराठा आरक्षणाच्या खोलात गेलो नाही, राज्य सरकारची चर्चा सुरू आहे, त्यातून मार्ग निघावा; मात्र ही अस्वस्थता दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्राने भूमिका घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाने हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे असे सांगितले आहे, त्यामुळे केंद्राने भूमिका घ्यायला हवी, असे मत व्यक्त करत पवार यांनी चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलावला.

COMMENTS