Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू

राष्ट्रवादी क्रमांक एकचा असेल ठाकरेंचा तीन नंबरचा पक्ष ः पृथ्वीराज चव्हाण

मुंबई/प्रतिनिधी ः कर्नाटक विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांतील नेत्यांची बैठक घेत मतभेद

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण.. जिवे ठार मारण्याची धमकी (Video)
महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांबाबत बेरकी कळवळा
आयजीच्या जीवावर बायजी उदार; महाविकास आघाडीचा भंकस कारभार

मुंबई/प्रतिनिधी ः कर्नाटक विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांतील नेत्यांची बैठक घेत मतभेद मिटवून एकत्र येवून आगामी निवडणुका लढवायच्या असल्याने पुढील तयारीला लागण्याचे संकेत दिले होते. मात्र आम्ही लोकसभेच्या 19 जागांवर लढणार असून, आमचेच सर्वाधिक खासदार निवडून आल्याचा दावा ठाकरे गटाने केल्यानंतर राष्ट्रवादीच क्रमांक एकचा पक्ष असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. जर राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष असेल तर, काँगे्रस दुसर्‍या क्रमाकांवर असून, ठाकरे गट तिसर्‍या क्रमांकांचा पक्ष असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच बघायला मिळत असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभेच्या कोण किती जागा लढेल यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये प्राथमिक चर्चा झाली असली तरी, त्यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेले नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचा सोलापूरच्या जागेवर डोळा असून, काँगे्रसचा त्याला विरोध आहे. त्यावरून महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांना खोचक टोले लगावतांना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याचे म्हटले होते. तर काँग्रेस लहान भाऊ असल्याचा उल्लेख केला होता. त्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. 20 मे रोजी कोल्हापूरमध्ये बोलतांना अजित पवार म्हणाले की, आपल्याला महाविकास आघाडी मजबूत ठेवण्याचे काम करायचे आहे. आपली जास्त ताकद असेल तर आघाडीमध्ये महत्व टिकेल. यापूर्वी काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या त्यामुळे वाटाघाटी करताना लहान भाऊ म्हणून आम्हांला भूमिका घ्यावी लागायची. आता मात्र वेगळी परिस्थिती आहे. आम्ही काँग्रेसपेक्षा मोठा भाऊ आहोत. काँग्रेसच्या 44 जागा आहेत तर आमच्या 54 आहेत. हे असे गणित आहे.  सोमवारी सोलापूरमध्ये बोलतांना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे, हे विधान चुकीचे नाही. आता ठाकरे गटात फक्त 16 आमदार उरले आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेट करत असतात, त्यात गैर काही नाही. राष्ट्रवादी एक असेल तर काँग्रेस दोन नंबरचा आणि उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा पक्ष आहे. यात चुकीचे काही नाही. दरम्यान, सोमवारी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी तुटू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. एकूणच तिन्ही पक्षांकडून एक प्रकारचे प्रेशर बनवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.

नाना पटोले मेरीटवर ठाम – काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जागा वाटपाबाबत प्रत्येक पक्षाने चाचपणी करावी. मात्र, जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवर होईल. महाविकास आघाडीतील ज्या पक्षाचे मेरिट जेथे असेल त्याप्रमाणे तिथे निर्णय घेतले जातील. पारंपरिक मतदार संघाबाबत म्हणायचे तर वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलल्या जातात. जागा वाटपाबाबत आम्ही काही समित्या तयार केल्या आहेत. त्यातही मेरिटच्या आधारावर चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सध्यातरी एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS