Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपविरोधात मविआचे खलबते

शरद पवारांच्या निवासस्थानी घेतली बैठक

मुंबई/प्रतिनिधी ः कर्नाटक विधानसभामध्ये काँगे्रसला प्रभावी बहुमताने विजय मिळाल्यानंतर रविवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवास

अभिजीत बिचुकले यांना जीवे मारण्याची धमकी
 सर्वोदय विदया मंदिर येथे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष-2023 साजरे
युक्रेनमध्ये अडकलेले 182 विद्यार्थी मुंबईत दाखल

मुंबई/प्रतिनिधी ः कर्नाटक विधानसभामध्ये काँगे्रसला प्रभावी बहुमताने विजय मिळाल्यानंतर रविवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची खलबते झाली असून, यामध्ये आगामी लोकसभा आणि येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. त्यासोबतच वज्रमूठ सभा महाविकास आघाडीकडून घेण्यात येणार असल्याची माहिती काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
रविवारी शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी शरद पवारांसह ठाकरे गटाचे संजय राऊत, काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, जयंतराव पाटील, यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी कर्नाटक विजय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजय, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच भाजपला धडा शिकवण्यासाठी जोरदार तयारी मविआने सुरू केल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले. संजय राऊत म्हणाले, माध्यमांत मविआबद्दल जे दाखवले जात आहे, तसे काही नाही. कर्नाटकात काँग्रेस नाही तर विरोधी पक्ष जिंकला आहे. मविआ सरकार पाडले ते कसे चुकीचे आहे हे आम्ही जनतेला सांगणार आहोत. हे सरकार बेकायदेशीर आहे, जनतेला आम्ही सर्वजण हेच समजून सांगणार आहोत. मविआचा महाराष्ट्रात विजय होणार आहे. संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजूने आहे हे समजून घ्या. हे सरकार गैर आहे. एवढे ताशेरे ओढूनही सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हसतात मी यावर जास्त बोलणार नाही. आम्ही कर्नाटकसारखा विजय मिळवून दाखवू. शिवसेनेची येत्या काळात चर्चा होणार. आमच्यात कोणतेही मतभेद नाही. कुणालाही आमच्या नात्याबंद्दल काळजी करण्याची गरज नाही. संजय राऊत म्हणाले, आम्ही मजबूत लोक आहोत. असाहय लोक दोन आहेत त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. ते दिल्लीकडे असाहतेने बघतात असे लोक आम्ही पाहीले नाहीत. उन्हाळा संपताच वज्रमूठ सभा घेऊ. जयंत पाटील म्हणाले, आजच्या बैठकीत निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. मविआ म्हणून सुप्रीम कोर्टाच्या निकालावर साधक बाधक चर्चा बैठकीवर झाली. पुढे कोणत्या गोष्टी होण्याची शक्यता आहे याची चर्चा झाली. अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाने जबाबदारी दिली याचाही आढावा घेतल्या आहेत. उन्हाळ्यामुळे मविआच्या बैठका पुढे ढकलल्या. जूनचा पाऊस पाहता आम्ही या बैठका सुरू करणार आहोत. मविआच्या सभाही पाऊस आणि ऊन पाहुन थांबवल्या त्या पुन्हा आम्ही अंदाज घेवून सुरू करू.

आघाडीला मिळणार नवा भिडू? – महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी येण्यास इच्छूक असतांना, एमआयएम देखील आघाडीमध्ये इच्छूक असल्याचे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे. भाजपला हरवण्यासाठी आम्ही कसलीही आणि कुठेही कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत. आम्ही महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इम्तियाज जलील यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. आम्ही महाविकास आघाडीसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून दोन पक्षांमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदींना वाटते की तेच कायमस्वरूपी पंतप्रधान राहणार आहेत. मात्र न्यूटनचा एक नियम आहे, जी वस्तू वर जाते ती तेवढ्याच वेगाने खाली देखील येते. मात्र मोदी खाली येईपर्यंत देशाचे मोठे नुकसान झालेले असेल, असा घणाघात जलील यांनी केला आहे.

COMMENTS