Homeताज्या बातम्यासंपादकीय

संस्थानच्या वंशजांनी शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा ! 

छत्रपती शाहू महाराज यांच्या  राजघराण्यातील वंशज सहयोगिता भोसले यांना नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजाप्रसंगी वेदोक्त मंत्र नाकारण्यात आल्याची घटन

कायदा नसतानाच होतेय डि-लिस्टींग !
हा सांस्कृतिक गुन्हाच ! 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 

छत्रपती शाहू महाराज यांच्या  राजघराण्यातील वंशज सहयोगिता भोसले यांना नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजाप्रसंगी वेदोक्त मंत्र नाकारण्यात आल्याची घटना अतिशय आधुनिक असलेल्या आजच्या महाराष्ट्रात जनमनाला धक्का देऊन गेली. समाज माध्यमावर याविषयी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या वेदोक्त प्रकरणाचा इतिहास छत्रपती शाहू महाराज यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेत थेट शंकराचार्य पर्यंतच्या संपत्ती जप्तीपर्यंत नेला होता;  हा इतिहास विसरता येणार नाही. शाहू महाराज यांचे वेदोक्त प्रकरण जे १८९९ मध्ये कोल्हापुरात सुरू झाले होते. त्या प्रकरणानंतर शाहू महाराजांनी प्रस्थापित व्यवस्थेबरोबर थेट संघर्ष दिला. राजा असूनही त्यांना शूद्र ठरवत त्यांच्यासाठी वेदोक्त नव्हे तर पुराणोक्त मंत्र म्हटले जातील, अशी भूमिका तत्कालीन पुरोहितांनी  घेतल्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी एका राजाला शूद्र संबोधण्याची चूक पुरोहितांनी करू नये, असे बजावले होते. त्यावर अंमलबजावणी न झाल्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांनी हे प्रकरण पुढे वाढवत नेले. ते एवढे विकोपाला गेले की तत्कालीन धर्मगुरू असणारे किंवा धर्मप्रमुख असणारे करवीर पीठाचे शंकराचार्य ब्रह्मनाळकर यांच्या मठाला दान दिलेली संपत्ती आणि उत्पन्न दोन्ही मिळून जे ऐंशी हजार रुपये एवढे होते, ते जप्त केले. हे प्रकरण सुरू असताना छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ या वर्षी कोल्हापूर संस्थानाच्या प्रशासनात मागासवर्गीय समाजासाठी ५० टक्के जागा राखीव केल्या. या प्रकारामुळे तत्कालीन पुरोहित समाज अधिक संतप्त झाला होता. शाहू महाराजांच्या विरोधात त्यांनी थेट ब्रिटिशांपर्यंत तक्रार केली होती. मात्र, ब्रिटिशांनी त्यांचा तक्रार अर्ज फेटाल्यामुळे एकूणच या संघर्षात शाहू महाराजांचा विजय झाला होता. मात्र, आज परिस्थिती बदललेली आहे. लोकशाही व्यवस्थेत राजेशाही संपुष्टात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत ज्या पद्धतीने पुरोहितशाही पुन्हा आपले सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पुढे आली आहे, त्यातून महाराष्ट्र हा एक प्रकारे संतप्त झाल्याचे दिसतो आहे. मात्र, या प्रकरणात एकूण जो घटनाक्रम घडला, ते पाहता सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील राजवंशजांनी या प्रकरणाचा निषेध करून संघर्ष पुकारायला हवा. परंतु त्या अनुषंगाने अजूनही विद्यमान सत्ताधाऱ्यांशी साटेलोटे असणाऱ्या राजघराण्याने अद्याप त्या अनुषंगाने निषेधाचे शब्द व्यक्त केलेले नाहीत, ही आजच्या काळातील चिंतेची बाब आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात खोले बाईंनी देखील अशाच प्रकारचा विवाद उभा केला होता. ज्यात मराठा समाजाच्या बाईने त्यांच्या स्वयंपाक घराला बाटवण्याचा आरोप केला होता, आणि त्या महिलेच्या हाताचा स्वयंपाक खाण्यास नकारही दिला होता. हे प्रकरण ताजे असतानाच थेट शाहू महाराजांच्या राजघराण्याशी अशा प्रकारची घटना होते, ही बाब सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला निश्चितपणे चीड आणणारी आहे! परंतु, या बाबीत सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की,  छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या वंशजानी आपली राजकीय भूमिका साकारताना ज्या संस्कृतीने छत्रपती शाहू महाराजांना त्रास दिला होता, त्याच संस्कृतीबरोबर ते आपली हात मिळवणी करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या लढ्याचं नेतृत्व करण्यासाठी जर राजवंशज पुढे नसतील तर, जनता त्याबाबतीत फक्त चीड व्यक्त करू शकते. त्या संदर्भात कुठलीही आंदोलनात्मक कारवाई करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. शाहू महाराजांच्या काळात जेव्हा हे प्रकरण घडले, त्यावेळी शाहू महाराजांनीच या प्रकरणाच्या विरोधात लढण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे आजच्या त्यांच्या वंशजानी छत्रपती शाहू महाराज यांच्यापासूनच सांस्कृतिक लढ्याची प्रेरणा घ्यावी. हीच प्रेरणा त्यांना लोकशाही, समता, स्वातंत्र्य, न्यायाची मूल्ये अबाधित ठेवण्यासाठी पूरक ठरेल हे, त्यांनी लक्षात घ्यावे!

COMMENTS