Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर विकासासाठी महापालिका घेणार तीनशे कोटीचे कर्ज

यंदाचे बजेट 1240 कोटींचे, उद्यापासून स्थायी समिती करणार चर्चा

अहमदनगर ः केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजना-दोन योजनेसाठी 850 कोटी, उपनगरीय गटार योजनेसाठी 650 कोटी व शहरातील डीपी रस्ते वगळून अन्य छोट्या-मोठ्या

भूसंपादनाचे पैसे गायब…मनपा बजेट चर्चाही स्थगित
ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी पहिला आठवडा कधी उजाडणार ?
अवैध पाणी कनेक्शन्स तोडले…मनपा अभियंत्याचे जाहीर कौतुक

अहमदनगर ः केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजना-दोन योजनेसाठी 850 कोटी, उपनगरीय गटार योजनेसाठी 650 कोटी व शहरातील डीपी रस्ते वगळून अन्य छोट्या-मोठ्या रस्त्यांसाठी 300 कोटी असे सुमारे दीड हजार कोटी रुपये केंद्र व राज्य सरकारकडून महापालिकेला मिळणार असल्याने या निधीतील स्वहिस्सा सुमारे 30 टक्के भरण्यासाठी महापालिकेच्या इतिहासात यंदा प्रथमच सुमारे 300 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मनपाच्या यंदाच्या सुमारे 1240 कोटी रुपयांच्या बजेटचे हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. दरम्यान, मनपाने यंदा 300 कोटींचे कर्ज प्रस्तावित केले असले तरी प्रत्यक्षात केंद्र व राज्य सरकारच्या येणार्‍या विकास निधी रकमेच्या टप्प्यांच्या अनुषंगाने यंदा मनपाला शंभर कोटी रुपयांचे कर्ज खासगी आर्थिक संस्थांकडून घ्यावे लागणे अपेक्षित आहे, असे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारकडून विकास योजनांसाठी बिनव्याजी कर्ज निधी उपलब्धता योजनेबाबतही पाठपुरावा सुरू असून, असा कर्ज निधी मिळवण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेचे मागील वर्षीचे बजेट 849 कोटींचे मूळ व 871 कोटीचे सुधारित होते. ते यंदा तब्बल 1240 कोटींचे झाले आहे. अर्थात ही सुमारे 400 कोटींची वाढ प्रस्तावित कर्ज नियोजनामुळे झाल्याचे सांगून आयुक्त डॉ. जावळे म्हणाले की, विकास योजनांसाठी कर्ज अपेक्षित धरले असले तरी या तुलनेत तेवढे उत्पन्नही अपेक्षित आहे. शहरातील सुमारे 350 वर छोट्या-मोठ्या व्यवसायांचे परवाना शुल्क तसेच नव्याने होणार्‍या मालमत्ता सर्व्हेक्षणानुसार नव्या मालमत्तांकडून अपेक्षित सुमारे 100 कोटीवर कर संकलन नियोजित आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रभाग स्वेच्छा निधीत वाढ – नगर शहरामध्ये 17 प्रभाग असून या प्रभागांमधील छोट्या-मोठ्या विकास कामांसाठी महापालिका प्रशासनाने मागील वर्षी 7कोटी 47 लाखाची तरतूद केली होती. त्यामध्ये यंदा सुमारे सव्वा कोटीने वाढ करण्यात आली आहे. हा निधी आता 8 कोटी 64 लाखाचा झाला आहे. याशिवाय मनपा प्रशासनाने यंदा 80 कोटीचे संकलित कर उत्पन्न तसेच 42 कोटीची पाणीपट्टी वसुली उत्पन्न अपेक्षित धरले आहे. लोकसहभागातून मनपा शाळा दुरुस्तीचाही विचार प्रस्तावित असल्याचे आयुक्त जावळेंनी स्पष्ट केले. शहरात चांगल्या दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी नवीन रस्ते व रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे तसेच मूलभूत आरोग्य, वीज व पाणीपुरवठाच्या चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी महापालिका कटिबध्द आहे. शासनाकडून प्राप्त होणार्‍या विविध कामांसाठीच्या निधीतील मूलभूत सुविधा विकास योजना, दलितेतर वस्ती सुधारणा योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, अल्पसंख्याक विकास निधी, 15 वा वित्त आयोग, सर्वांसाठी घरे निधी, पाणी पुरवठा निधी, आमदार निधी, खासदार निधी यामधील कामे पूर्णत्वास नेणे व नवीन कामांसाठी शासन स्तरावर प्रयत्न करून जास्तीतजास्त निधी मिळवून शहराचा चांगल्या प्रकारे विकास करणे त्याचप्रमाणे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून व नव्या घरांची नोंदमी झाल्यावर त्यांना घरपट्टी आकारणी करुन उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच महापालिकांच्या जागांचा विकास करून त्या माध्यमातून महसूल वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरातील अपूर्ण अवस्थेतील योजना व विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येऊन शहराचा विकास करण्यासाठी महापालिका कटिबध्द आहे, असेही आयुक्त डॉ. जावळे यांनी आवर्जून स्पष्ट केले.

उद्यापासून होणार चर्चा – महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या पहिल्याच सभेत आयुक्त डॉ. जावळे यांनी यंदाचे बजेट त्यांना सादर केले. यावेळी स्थायी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सभागृहनेते विनीत पाऊलबुद्धे यांनी बजेटवर अभ्यास करून चर्चेसाठी वेळ मागितला व त्यास विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे सभापती कवडे यांनी बुधवारी (15 मार्च) सकाळी 11 वाजल्यापासून बजेटवर चर्चा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले व तोपर्यंत स्थायी समितीची बजेट बैठक स्थगित केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे व उपायुक्त डॉ. श्रीनिवास कुरे, मुख्य लेखाधिकारी शैलेश मोरे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, लेखा विभागाचे अनिल लोंढे उपस्थित होते.

महापालिकेत…असे येणार पैसे

-महापालिका अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न रु. 432 कोटी 21 लाख.

-भांडवली जमा रु. 740 कोटी 5 लाख अंदाजित आहे.

-महसुली उत्पन्नात संकलित करापोटी रु. 80 कोटी 80 लाख.

-संकलित करावर आधारीत करापोटी 79 कोटी 70 लाख.

-जीएसटी अनुदान 120 कोटी 60 लाख.

-इतर महसुली अनुदान रु. 17 कोटी 85 लाख.

-गाळा भाडे 3 कोटी 60 लाख.

-पाणीपट्टी 42 कोटी 61 लाख.

-मीटरद्वारे पाणी पुरवठापोटी 20 कोटी.

-संकीर्ण 42 कोटी 39 लाख आदी उत्पन्न घटक महत्वाचे आहेत तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरून रु. 818 कोटी 37 लाख अंदाजित जमा होणार आहेत.

महापालिकेत…असे खर्च होणार पैसे

-वेतन, भत्ते व मानधनावर 138 कोटी 9 5 लाख, पेन्शन 47 कोटी 44 लाख

-पाणी पुरवठा वीज बिल 35 कोटी, स्ट्रीट लाईट वीज बिल 5 कोटी 50 लाख.

-शिक्षण विभाग वेतन हिस्सा व इतर खर्च हिस्सा 5 कोटी 72 लाख.

-महिला व बाल कल्याण योजना 3 कोटी 34 लाख.

-अपंग पुनर्वसन योजना 3 कोटी 34 लाख.

-मागासवर्गीय कल्याणकारी योजना 10 कोटी 4 लाख.

-मनपा सदस्य (नगरसेवक) मानधन 1 कोटी 50 लाख.

-औषधे व उपकरणे 1 कोटी.

  • नगरसेवक सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी 8 कोटी 64 लाख.

-कचरा संकलन व वाहतूक 1 कोटी 50 लाख.

-पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 1 कोटी.

-टँकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 2 कोटी 20 लाख.

-अशुध्द पाणी आकार 2 कोटी.

-विविध वाहने खरेदी 1 कोटी 50.

-नवीन रस्ते 13 कोटी, रस्ते दुरुस्ती 4 कोटी 25 लाख, इमारत दुरुस्ती 1 कोटी 25 लाख.

-शहरातील ओढ-नाले साफसफाई 45 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 50 लाख.

-कोंडवाड्यावरील खर्च 26 लाख .

-वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च 1 कोटी 25 लाख.

-हिवताप प्रतिबंधक योजना 40 लाख.

-कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 21 लाख.

-मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 55 लाख.

-मालमत्ता सर्वेक्षण 20 कोटी.

-मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प 20 लाख.

-पुतळे बसविणे 2 कोटी 10 लाख.

-भविष्य निर्वाह निधी तूट 5 कोटी .

-बेवारस प्रेत विल्हेवाट 75 लाख.

-उद्यान दुरुस्ती 75 लाख.

COMMENTS