शिर्डीमध्ये स्वतंत्र कोविड रुग्णालय  ; मुश्रीफ यांची घोषणा, साई संस्थानची घेणार मदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीमध्ये स्वतंत्र कोविड रुग्णालय ; मुश्रीफ यांची घोषणा, साई संस्थानची घेणार मदत

नगर जिल्हा रुग्णालयावर येणारा रुग्ण उपचारांचा ताण कमी करण्यासाठी आता शिर्डी येथील साई संस्थानच्या साईबाबा रुग्णालयासह साईनाथ रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे केली.

नगरच्या दोन पत्रकारांचा पोंभुर्ल्यात झाला गौरव…
सामाजिक बांधिलकी जपणारे जादूगार हांडे फाउंडेशन – कुलकर्णी
‘द फॅमिली मॅन’चा नवा विक्रम, जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज l Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर जिल्हा रुग्णालयावर येणारा रुग्ण उपचारांचा ताण कमी करण्यासाठी आता शिर्डी येथील साई संस्थानच्या साईबाबा रुग्णालयासह साईनाथ रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे केली. यामुळे शिर्डी व परिसरातील सहा-सात तालुक्यांतील रुग्णांना तिकडे उपचार सुविधा मिळतील व जिल्हा रुग्णालयावरील ताण 50 टक्के कमी होईल, असा विश्‍वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 

मुश्रीफ यांनी सकाळी कोपरगाव व शिर्डी येथे कोविड आढावा घेतल्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तसेच आमदार ड़ॉ. सुधीर तांबे, लहू कानडे, संग्राम जगताप, निलेश लंके, रोहित पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.

शिर्डी संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात 250 बेड असून, त्यापैकी 150 बेडवर कोविड रुग्णांंवर तर 100 बेडवर अन्य आजाराच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर येथीलच दुसर्‍या साईनाथ रुग्णालयात 300 बेड उपलब्ध असून, ते पूर्ण कोविड उपचार रुग्णालय जाहीर केले आहे. याशिवाय शिर्डीत संस्थानच्या भक्तनिवास इमारती असून, होस्टेल व अन्य सुविधाही आहेत. त्यामुळे शिर्डी व परिसरातील सहा-सात तालुक्यांतील रुग्णांना तेथे उपचार सुविधा दिल्या जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर व ़समर्पित कोविड सेंटर सुरू करण्यासही मान्यता दिल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील रुग्णांची सोय होणार आहे व जिल्हा रुग्णालयाचा ताण 50 टक्के कमी होणार आहे, असा दावाही मुश्रीफ यांनी केला.

विभागीय आयुक्तांवर ती जबाबदारी

सध्या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आहे. म्हणून आता ऑक्सिजन मिळण्यासाठी नियोजन सुरू आहे. नाशिक विभागीय आयुक्तांना यासंदर्भात नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली गेली आहे. जिल्ह्यात सध्या साठ केएल ऑक्सिजनची गरज आहे. या तुलनेत फक्त बावीस केएल साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिक विभागीय आयुक्त यांना हा साठा सत्तर-पंच्याहत्तर टक्के म्हणजे सुमारे 45 ते 50 केएल कसा उपलब्ध होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचे सांगितले आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले..

-जे रुग्ण आता सापडत आहे, त्यांना कुठल्या प्रकारे होम आयसोलेशन केले जाणार नाही. त्यांना आता नेमून दिलेल्या संस्थांतील विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाणार आहे.

-जी हेल्पलाइन देण्यात आली होती ती कार्यरत नाही अशा तक्रारी आमदारांच्या व इतरांच्या आलेल्या होत्या. त्यामुळे आता संबंधित कक्षामध्ये सर्व अधिकार्‍यांचे फोन सुरू राहतील व लगेच शंकांचे निरसन केले जाईल, अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत.

-खाजगी रुग्णालयांमध्ये आकारल्या जाणार्‍या बिलांची दखल घेतली जाईल, यासाठी महापालिकेने एक पथक नेमले असून, ते बिलांचे ऑडिट करणार आहे व महसूल विभागाचे अधिकारीसुद्धा त्या पथकामध्ये राहणार आहेत. कोणीही जर जास्त बिल रुग्णांकडून घेतले तर निश्‍चितपणे त्या रुग्णालयावर कारवाई केली जाईल. -रेमडीसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन गरज असलेल्या रुग्णांनाच दिले जावे. त्यांचा अतिरिक्त वापर केला जाऊ नये. मेडिकल प्रोटोकॉलनुसारच त्याचा वापर व्हावा. जिल्ह्यात सध्या रेमडेसीवीर पाहिजे त्याप्रमाणात उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती असली तरी टास्क फोर्सने रेमडेसीवीर हे एकमेव जीवन रक्षक औषध नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे केवळ त्याच औषधाचा आग्रह धरणे योग्य नाही. जिल्हा वार्षिक नियोजन समितीतून 15 कोटी कोरोना उपाययोजनांसाठी दिले जाणार असून, याव्यतिरिक्त प्रत्येक आमदारांना 1 कोटी रुपये यासाठी दिले जाणार आहे. गडहिंग्लजमध्ये एका रुग्णालयाने हवेतील कार्बनडाय ऑक्साईड व नायट्रोजन वायू बाजूला करून ऑक्सिजन मिळवले आहे. अशा सुविधेसाठी आमदारांनी निधीचा उपयोग केला पाहिजे.-बांधकाम कामगार, घरकाम करणार्‍या महिला, रिक्षाचालक व अन्य घटकांना शासन दीड हजार रुपयांची मदत देणार आहे. पण सलून व्यावसायिक व मुंबईचे डबेवाले यांनाही अशी मदत मिळण्यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करावा.

राजकीय भाष्य करीत आवाहन

राजकारण म्हमून बोलत नाही, पण रेमडीसिविर इंजेक्शन निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकारने अगोदरच घेतला असता तर इंजेक्शनचा तुटवडा जाणवला नसता, असा दावा करून मुश्रीफ म्हणाले, आ.राधाकृष्ण विखे यांची शिर्डी येथे भेट झाली आहे, त्यांच्या शंकांचे निरसन त्याठिकाणी झाले आहे. हातात हात घेऊन काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली असल्याचे सांगून मुश्रीफ यांनी, गुजरातमध्येही करोना उद्रेक झालेला असताना त्यावेळी उच्च न्यायालयाने देवाच्या भरवशावर जनता सोडता येणार नाही असे स्पष्ट केले असल्याचेही आवर्जून सांगून, त्यामुळे यात कोणीही राजकारण न करता सगळे मिळून एकत्रपणे खंबीरपणे काम करू असा सूचक टोलाही लगावला. मी जरी नगरला दोन आठवड्यांनी येत असलो तरी जिल्ह्यात इंजेक्शन व ऑक्सिजन पुरवठ्यासह अन्य अडचणी सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून, घार फिरे आकाशी, तिचे चित्त पिलापाशी…असे उदगारही त्यांनी आवर्जून काढले.

COMMENTS