Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे विरुद्ध पाटील लढत रंगणार

सहा उमेदवारांची रिंगणातून माघार

अहमदनगर/प्रतिनिधी ः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे व धुळे येथील अपक्ष उमेदवार

घरगुती वादातून मुलाने केला आजोबांच्या मदतीने बापाचा खून
स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते शिधापत्रिकाधारकांना मोफत साड्या वाटप
कर्जतमध्ये कवयित्री स्वाती पाटील यांनी केला पत्रकारांचा सत्कार

अहमदनगर/प्रतिनिधी ः विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे व धुळे येथील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात प्रमुख लढत होण्याची चिन्हे आहेत. निवडणूक रिंगणातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह दोन पक्षीय उमेदवार व अन्य 12 अपक्ष उमेदवार किती मतदान घेतात, यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. दरम्यान, सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी सहाजणांनी रणछोडदास होणे पसंत केले असून, आता रिंगणात 16 उमेदवार आहेत व यात दोन पक्षीय आणि अन्य 14 अपक्ष उमेदवार आहेत.

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे यांनी दिली. अमोल बाळासाहेब खाडे, डॉ.सुधीर सुरेश तांबे, हिंदुस्तान जनता पार्टीचे दादासाहेब हिरामण पवार, अ‍ॅड. धनंजय कृष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम व धनराज देवीदास विसपुते या सहा उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता निवडणूक रिंगणात रतन कचरु बनसोडे (नाशिक, वंचित बहुजन आघाडी), सुरेश भीमराव पवार (नाशिक, नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी) या दोन पक्षीय उमेदवारांसह अनिल शांताराम तेजा (नाशिक), अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर (धुळे), अविनाश महादू माळी (नंदूरबार), इरफान मो. इसहाक (मालेगाव, जि.नाशिक), ईश्‍वर उखा पाटील (धुळे), बाळासाहेब रामनाथ घोरपडे (नाशिक), अ‍ॅड. जुबेर नासिर शेख (धुळे), अ‍ॅड.सुभाष राजाराम जंगले (श्रीरामपूर), सत्यजित सुधीर तांबे (संगमनेर), नितीन नारायण सरोदे (नाशिक), पोपट सीताराम बनकर (अहमदनगर), शुभांगी भास्कर पाटील (धुळे), सुभाष निवृत्ती चिंधे, (अहमदनगर) व संजय एकनाथ माळी (जळगाव) असे 14 अपक्ष मिळून एकूण 16 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. यात नगर जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. निपुण विनायक (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीसंदर्भात काही तक्रार असल्यास डॉ. निपुण विनायक यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9834874768 असा आहे.

पाठिंब्यांची उत्सुकता कायम – काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी व एबी फॉर्म दिला असताना त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता चिरंजीव सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला व ते काँग्रेसचेच उमेदवार असल्याचे सांगितले. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तक्रारीवरून अखिल भारतीय काँग्रेसने डॉ. तांबे यांना पक्षातून निलंबित केले आहे व सत्यजित तांबेंवरही कारवाईचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे हे आता काँग्रेस वा महाविकास आघाडीचे उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांना आता भाजपकडून पाठिंब्याची अपेक्षा आहे. भाजपनेही अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. दुसरीकडे धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचा दावा केला असला तरी दुसरे अपक्ष उमेदवार नगर जिल्ह्यातील अ‍ॅड. सुभाष जंगले यांनीही महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. दोन उमेदवारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले असले तरी महाविकास आघाडीनेही अजून अधिकृतपणे आपला पाठिंबा जाहीर केलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर आता निवडणूक रिंगणातील 14 अपक्षांपैकी कोणाला भाजपचा व कोणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

जाधवांची श्रद्धा व सबुरी – भाजपकडून उमेदवारी मागणारे नगरचे अ‍ॅड. धनंजय जाधव साईभक्त असून, त्यांनी श्रद्धा व सबुरीचा मंत्र जपत निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार व नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार, मी नाशिक विभाग पदवीधर मतदासंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेत आहे तसेच या पदासाठी मला पात्र समजून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे तसेच मागील 1 वर्षापासून माझ्यासाठी प्रयत्न करणारे माझे सर्व सहकारी व पाठिंबा देणार्‍या सर्व संघटना आणि सर्व पदवीधर मतदारांचे मी आभार मानतो. ओम साई राम…श्रध्दा सबुरी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अ‍ॅड. जाधव यांनी माघार घेतल्याने आता त्यांना शहर भाजपमधील एखादे पद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS