एकमेकांच्या नगरसेविका फोडल्या…भाजप नगरसेवकांतील गटबाजी शिगेला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकमेकांच्या नगरसेविका फोडल्या…भाजप नगरसेवकांतील गटबाजी शिगेला

मनपा विरोधी पक्ष नेतेपदाची रस्सीखेच जोरात, प्रदेश भाजपच्या निर्णयाकडे लक्षअहमदनगर/प्रतिनिधी-महापालिकेतील भाजप नगरसेवकांमधील राजकारण आता टोकाला पोहोचण

तिडके पाटील विद्यालयाचा दहावीचा 98.88 टक्के निकाल
अण्णा भाऊ साठे योजनेच्या 1.65 कोटींच्या कामास मान्यता
महिला शिक्षण दिनी शिक्षिकांचा झाला गौरव…

मनपा विरोधी पक्ष नेतेपदाची रस्सीखेच जोरात, प्रदेश भाजपच्या निर्णयाकडे लक्ष
अहमदनगर/प्रतिनिधी-महापालिकेतील भाजप नगरसेवकांमधील राजकारण आता टोकाला पोहोचण्याच्या स्थितीत आहेत. विरोधी पक्ष नेतेपदी कोणी बसायचे, यावरून हे राजकारण रंगले आहे. चक्क एकमेकांच्या वॉर्डातील नगरसेविका फोडण्यापर्यंत मजल गेली आहे. नुकत्याच सत्तेवरून उतरलेल्या भाजपला आता मनपात विरोधी पक्षनेतेपदाचे वेध लागले आहेत. पण माजी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे व केडगावचे नगरसेवक मनोज कोतकर असे तीनजण इच्छुक असल्याने यातील दोघांनी म्हणजे कोतकर व वाकळे यांनी एकमेकांना शह-प्रतिशहचे राजकारण सुरू केले आहे. दरम्यान, प्रदेश भाजपकडून विरोधी पक्ष नेतेपदाचा उमेदवार निश्‍चित होणार असून, त्यानुसार गटनेते म्हणून तसे पत्र दिल्यानंतर संबंधितांची या पदावर नियुक्ती केली जावी, असे पत्र मनपातील भाजपच्या गटनेत्या व माजी उपमहापौर मालनताई ढोणे यांनी महापौर रोहिणी शेंडगे यांना दिले आहे.
महापालिकेत आधी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता होती. आता महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीने शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांना पाठिंबा दिला व त्यामुळे त्या महापौर झाल्या आहेत. तसेच यानिमित्ताने या सत्तेत राष्ट्रवादीनेही प्रत्यक्ष सहभाग घेत उपमहापौरपदी गणेश भोसले यांची निवड केली आहे. बहुजन समाज पक्षाचे व काँग्रेसचे प्रत्येकी चार नगरसेवकही सेना-राष्ट्रवादी समवेत असल्याने मनपात आता महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. दुसरीकडे सत्तेतून पायउतार झाल्यावर सत्तेत नसलेला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उरला असून, त्यांच्या 15 नगरसेवकांपैकी तिघांना आता मनपात विरोधी पक्ष नेता होण्याचे वेध लागले आहेत. यातून रस्सीखेच त्यांच्यात सुरू झाली आहे व ती सध्या शहरात चर्चेचा विषय झाली आहे.

कोतकर-वाकळे संघर्षात गंधे एकाकी
महापालिकेत सुमारे 9-10 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून व राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्थायी समितीचे सभापतीपद मिळवणारे केडगावचे भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आता मनपात विरोधी पक्ष नेतेपदाच्या दालनात बसण्याचे ठरवले असून, चक्क भाजपच्या सात नगरसेवकांचा पाठिंबाही मिळवला आहे. विशेष म्हणजे यात माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभाग सहामधील नगरसेविका पल्लवी जाधव यांचा समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोटनिवडणुकीत जाधव यांना विजयी करण्यात वाकळे यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत त्यांना आपल्याबाजूने वळवण्यात कोतकरांना यश आल्याने हा वाकळेंना मोठा धक्का मानला जात आहे. पण दुसरीकडे वाकळेंनीही खेळी करीत केडगावच्या ज्या प्रभागातून कोतकर निवडून आले, त्या प्रभागातील पक्षाच्या नगरसेविका व मनपातील महिला-बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके यांना आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवले आहे. सध्याच्या स्थितीत भाजपच्या 15 नगरसेवकांपैकी 8जण कोतकरांकडे असून, वाकळेंकडे 5जण आहेत तर गंधे एकाकी पडले असून, ढोणे यांचा पाठिंबा मात्र गुलदस्त्यात आहे. पण यानिमित्ताने भाजपची रस्सीखेच शहरात मात्र चर्चेची झाली आहे.

कराळेंचे नाव, सही नाही
कोतकर यांनी स्वतःसह आठ नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे पत्र शुक्रवारी महापौर शेंडगे यांना दिले असून, महापालिकेतील नवीन सत्ता समीकरणात भारतीय जनता पक्षाने तटस्थ भूमिका घेतल्याचे यात नमूद केले आहे व नगरसेवक कोतकर यांना मनपातील विरोधी पक्ष नेता म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी यात केली आहे. या पत्रावर कोतकर यांच्यासह नगरसेवक राहुल कांबळे, सोनाली चितळे, गौरी ननावरे, स्वप्निल शिंदे, मनोज दुलम, पल्लवी जाधव, आशा कराळे यांची नावे आहेत. मात्र, यावर सात नगरसेवकांच्याच सह्या आहेत व कराळे यांची सही नाही. त्यामुळे तोही चर्चेचा विषय झाला आहे. दुसरीकडे आता वाकळेंच्या बाजूने रवींद्र बारस्कर, रजनी ताठे, सोनाबाई शिंदे, लता शेळके व स्वतः वाकळे असे पाचजण राहिले आहेत. तर गंधे यांच्यामागे कोणीही नाही तसेच गटनेत्या ढोणे यांनी अजूनही कोणत्याही गटाला साथ देण्याचे स्पष्ट केलेले नाही. विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेतेपदासाठी ढोणे यांचेही नाव चर्चेत होते. पण पक्षाच्या गटनेत्या तसेच उपमहापौरपद भूषवले असल्याने आता नवे पद नको, या मानसिकतेत त्यांनी या शर्यतीपासून दूर राहणेच पसंत केले आहे.

ढोणेंनी दिले पत्र
मध्यंतरी माजी महापौर वाकळे यांनी महापौर शेंडगे यांना नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र देऊन त्यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती करावी, अशी मागणी केली व त्यानुसार महापौर शेंडगेंनी त्यांना तसे पत्रही दिल्याची जोरदार चर्चा होती. पण खुद्द वाकळे यांनी व महापौर शेंडगे यांनी याचा इन्कार केला. असे कोणतेही पत्र दिले नसल्याचे वाकळेंनी व असे कोणतेही पत्र आले नसल्याचे शेंडगेंनी सांगितले. मात्र, या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या गटनेत्या ढोणे यांनी महापौर शेंडगेंना पत्र देऊन, प्रदेश भाजपकडून जे नाव मला कळवले जाईल, ते नाव गटनेता म्हणून माझ्याकडून आपणास कळवले जाईल व त्याच नावाची आपण विरोधी पक्ष नेता म्हणून नियुक्ती करावी, असे या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे.

महापौर-आमदारांचा निर्णय?
महापालिकेच्या आताच्या वा मागच्या दोन्ही सत्ता समीकरणात शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मनपात भाजपची सत्ताही त्यांनीच आणली व आताही शिवसेनेची सत्ताही त्यांनीच आणल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्ष नेतेपद भाजपमधील कोणाला द्यायचे, याचा निर्णयही आ. जगतापच घेणार आहेत व त्यांच्या आदेशानुसार महापौर शेंडगे संबंधित व्यक्तीची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती करणार असल्याचे सांगितले जाते. या पार्श्‍वभूमीवर प्रदेश भाजपने सुचवलेले नाव वेगळे असेल तर मग मनपातील भाजप नगरसेवकांमध्ये उभी फूट पडण्याची चिन्हे आहेत.

COMMENTS