Homeताज्या बातम्यासंपादकीय

साहित्याचा निष्णात मार्गदर्शक हरपला ! 

 परिवर्तनाच्या विचारांशी बांधिलकी ठेवून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नावे घेऊन साहित्य निर्मिती करणारे आणि खासकरून ग्रामीण जीवनाची मांडणी आपल्या कथा,

निवडून आल्या महिला अन् शपथ घेताहेत पुरूष !
राज ठाकरे यांचे तुणतुणे !
पुन्हा नोटबंदी अशक्यच ! 

 परिवर्तनाच्या विचारांशी बांधिलकी ठेवून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नावे घेऊन साहित्य निर्मिती करणारे आणि खासकरून ग्रामीण जीवनाची मांडणी आपल्या कथा, कविता, कादंबरी चा भाग बनविणारे समिक्षक – साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निधनाने लेखनातील कृतीशील व्यक्तिमत्व हरपले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी जन्मलेले डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आपल्या पीएचडी चा प्रबंध निवडताना जाणीवपूर्वक ग्रामीण कथा-कांदबरीकार शंकरराव पाटील यांच्या साहित्याची निवड करतात तेव्हा, हे स्पष्ट होते की, त्यांचा पुढचा लेखन प्रवास हा ग्रामीण जीवनावर आधारित असणार. झालेही तसेच. अध्ययनानंतर अध्यापक म्हणून अध्यापनात आलेले डॉ. कोतापल्ले यांनी ग्रामीण जीवनाचा तीक्ष्ण अनुभव आपल्या लेखनाचा पाया बनविला. अर्थात, केवळ साहित्य निर्मितीत न रमता वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य कृतींची समिक्षा करण्याचे स्वतंत्र दालन त्यांनी निर्माण केले. प्रस्थापित साहित्याच्या समकक्ष येणारे ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्री आदी साहित्याला मान्यता न देण्यातून संघर्ष उभा राहिला. या संघर्षात स्वतंत्र अभिव्यक्तीची साहित्य संमेलने निर्माण झाली. ग्रामीण, दलित, आदिवासी, विद्रोही अशी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होऊ लागली. अशा साहित्य संमेलनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव साहित्याचे सृजन होऊ लागले. कथा, कादंबरी, कविता आदी प्रकारच्या साहित्य निर्मितीतून महाराष्ट्राचे साहित्य दालन समृद्ध करणारे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी परिवर्तनाच्या विचारांशी आपली बांधिलकी जपली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असताना महाराष्ट्रात त्यांनी आपल्या कामकाजातून वेगळा ठसा उमटवला. मात्र, २०१२ साली चिपळूण येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतल्यानंतर एकूणच परिवर्तनवादी साहित्य विश्वाने त्यांच्यावर काही प्रमाणात टीकाही केली. चिपळूण साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष स्थानाची लढत देताना त्यांच्या विरोधात ह.मो. मराठे हे साहित्यिक प्रतिस्पर्धी म्हणून उभे होते. याबरोबरच डॉ. अशोक बागवे आणि शिरीष देशपांडे हे अन्य दोन्ही उमेदवारही होते. या प्रतिस्पर्धीतून पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष जातीचा उल्लेख करत ह. मो. मराठे यांनी त्यांच्या ब्राह्मण असण्याचा प्रचार प्रत्यक्षात प्रचारात आणला होता. यावरून ह. मो. मराठे यांच्यावरही प्रचंड टीका झाली होती. मात्र, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाचशेच्या च्या वर मते मिळवून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड झाली होती. हा तोच काळ होता, जो विद्रोही साहित्य चळवळीने प्रस्थापित साहित्य संमेलनात परिवर्तनवादी साहित्यिकांनी जाऊ नये, असा प्रचार काळ होता. परंतु, प्रस्थापित साहित्य दालनाने दलित, आदिवासी साहित्यिकांव्यतिरिक्त ग्रामीण साहित्यिकांना आपल्या दालनात आणताना अध्यक्षपदाच्या बाबीचा चांगला उपयोग केला होता. असो. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आपल्या साहित्य लेखनातून शैली, आशय आणि अभिव्यक्ती यांचे संपूर्ण वेगळेपण निर्माण केले. साहित्याची विपुल निर्मिती करताना डॉ. कोतापल्ले यांनी माणूस हाच आपल्या साहित्याचा केंद्रबिंदू बनवला. ग्रामीण जीवनातील जगण्याची भ्रांत आणि त्यासाठी उपसावे लागणारे कष्ट हा आपल्या साहित्य निर्मितीचा त्यांनी विषय म्हणून जपला. त्यांच्या साहित्यातून प्रस्थापित साहित्याचे उणेपण जसे दाखवले तसे परिवर्तनाच्या साहित्यालाही त्यांनी व्यापकता कशी आणावी याचे भान निर्माण करून दिले. विपुल साहित्य आणि वैचारिक लेखन करणारे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या जाण्याने साहीत्याचा निष्णात मार्गदर्शक हरपला!

COMMENTS