Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांचा लाभ घ्यावा : मंगला धोटे

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागरिकांसाठी असणारे कायदे, हक्क व कर्तव्याची विविध शिबीरांच्या माध्यमातून जनजागृती करत असते. तस

शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर हल्ला; राजकीय वादातून हल्ला झाल्याची चर्चा
फलटण-लोणंद लोहमार्गावरील रेल्वेसेवा आजपासून पुन्हा सुरु
वारणा नदी काठी आढळली 6 फुटांची मगर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागरिकांसाठी असणारे कायदे, हक्क व कर्तव्याची विविध शिबीरांच्या माध्यमातून जनजागृती करत असते. तसेच प्राधिकरणामार्फत समाजातील दुर्बल घटकांसाठी मोफत विधी सेवा पुरविली जाते. याचा जास्तीत-जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा मंगला धोटे यांनी केले.
येथील कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विधी व सेवा आणि कायदेविषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजना महाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा मंगला धोटे बोलत होत्या. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांच्यासह न्यायाधीश उपस्थित होते.
नागरिकांना कायदे विषयक माहिती होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रत्येक घरी पोहचून कायदे विषयक माहिती दिली जाते, असे सांगून धोटे म्हणाल्या, राज्य शासनाने अनेक लोकाभिमुख कायदे केले आहेत. यामध्ये शासकीय महिला कर्मचार्‍यांसाठी प्रसुती रजा आहे. ही रजा 180 दिवसांपर्यंत मिळते. महाशिबीरात विविध शासकीय योजनांचे व तसेच कायदे विषयक स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलला भेटी देवून आपल्यासाठी असणार्‍या योजनांची माहिती करुन घ्यावी व इतरांनाही सांगावी, असे आवाहन धोटे यांनी केले.
जिल्हा परिषद आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास या आधारावर काम करत असल्याचे सांगून खिलारी म्हणाले, प्रशासनाचा पर्यटन विकासावर भर राहणार आहे. यामध्ये गावातील नागरिकांना गावामध्येच रोजगार कसा मिळेल यावर काम करणार आहे. नदींचे प्रदुषण वाढत आहे. यावरही सातारा जिल्हा परिषद काम करणार असून प्रत्येक गावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाने स्वच्छ पाणी पोहचविण्यात येणार आहे. 1 हजार 400 गावांमध्ये या योजनेंतर्गत काम सुरु असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी यावेळी सांगितले.
सातारा पोलीस विभागामार्फत 112 क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास नजीकच्या पोलीस स्टेशनकडून लवकरात लवकर मदत मिळणार आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठीही भरोसा सेल कार्यान्वीत करण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून अडचणी सोडविल्या जात आहे. पोलीस दलाने महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले असून महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प सातार्‍यात राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शाळा, महाविद्यालयांमध्ये मुलींना कायदेविषयक व स्वसंरक्षणाचे धडे दिले जात असल्याचे पोलीस अधीक्षक शेख यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी महाशिबीरामागील भूमिका सांगितली. शिबीरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS