गोंदवले / वार्ताहर : समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री सतोबा देवाची यात्रा टाकेवाडी (ता. माण) येथे भक्तांच्या अलोट गर्दी झाली. दोन वर्
गोंदवले / वार्ताहर : समस्त धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री सतोबा देवाची यात्रा टाकेवाडी (ता. माण) येथे भक्तांच्या अलोट गर्दी झाली. दोन वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या या यात्रेत राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या भाविकांचा उत्साह शिगेला पोहचला होता. माणसे व वाहनांच्या गर्दीने सतोबाचा डोंगर फुलून गेला होता.
मलवडीच्या उत्तरेला असलेल्या टाकेवाडी येथील श्री सतोबा देवस्थान उंच डोंगरावर असून, त्याखाली असलेल्या विस्तीर्ण पठारावर यात्रा भरते. घटस्थापनेपासून श्री सतोबा देवाच्या यात्रेस सुरवात झाली होती. मंगळवार, दि. 5 रोजी देवाचा छबिना काढण्यात आला. बुधवार, दि. 5 रोजी पहाटे पाच वाजता ’श्रीं’ची महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी 8 वाजता ’श्री’ची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
डोंगराच्या हरीचं चांगभलं’, ’सतोबाच्या नावानं चांगभलं’ असा गजर करत भाविकांनी भंडार्याची जोरदार उधळण केली. विविध गावांवरून आलेल्या मानाच्या काठ्या, ढोल-लेझीम तसेच गजी पथकाच्या साथीने नाचविण्यात आल्या. गजी नृत्य पाहण्यात शौकिन रंगून गेले होते. काही ठिकाणी पारंपरिक धनगरी ओव्यांचा फड भलताच रंगात आला होता. आपल्या आवडीच्या ओव्या ऐकण्यासाठी शौकिन मनसोक्तपणे पैसे देत होते. मेवा-मिठाई, खेळणी यांच्या दुकानांची यावर्षी मोठी रेलचेल होती. तसेच मेंढ्यांच्या लोकरीपासून बनविण्यात येणार्या घोंगड्या व जान यांची मोठी उलाढाल होत होती.
श्री सतोबा देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत टाकेवाडी, दहिवडी पोलिस ठाणे, पंचायत समिती आरोग्य विभाग, महावितरण आदींनी यात्रेचे नेटके नियोजन केले होते.
COMMENTS