जरे हत्याकांडातील आरोपीचा जामीन फेटाळला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जरे हत्याकांडातील आरोपीचा जामीन फेटाळला

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी ऋषिकेश उर्फ टम्या पवार (प्रवरानगर) याने जामीन मिळण्यासाठी

सावेडी जॉगिंग ट्रॅक मैदान विविध समस्यांनी ग्रासले
छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन
केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी ऋषिकेश उर्फ टम्या पवार (प्रवरानगर) याने जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अर्ज जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी फेटाळला आहे. या खून प्रकरणातील सहा आरोपींपैकी न्यायालयीन कोठडीत असलेल्या टम्या पवारने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. पवारच्या जामीन अर्जाला विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील व जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी कडाडून विरोध केला. पवार याच्याबाजूने अ‍ॅड. विजय गुंदेचा यांनी काम पाहिले.

रेखा जरे यांची गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री आठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे, टम्या पवार याच्यासह एकूण सहा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. यापैकी पाच आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे तसेच नंतर आरोपी बोठे याच्याविरुद्धही पुरवणी दोषारोप पत्र दाखल झाले आहे. त्यानंतर या आरोपींपैकी टम्या पवार याने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणीच्यावेळी सरकारी पक्ष व फिर्यादीची बाजू मांडताना सरकारी वकील अ‍ॅड. यादव पाटील व फिर्यादीचे वकील अ‍ॅड. पटेकर पटेकर यांनी,आरोपी टम्या पवारने हत्याप्रकरणातील बोठेसह इतर आरोपींशी 24 नोव्हेंबर 2020 रोजी किमान 17 वेळा मोबाईलवरून संपर्क साधला आहे व पोलिस तपासात ही बाब निष्पन्न झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी करंजी घाटात अपघात घडवून रेखा जरे यांची हत्या करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता मात्र तो फसला. करंजी घाटात रेखा जरे यांची हत्या करण्याचा प्रयत्न फसल्याने त्यांच्या हत्येचा पुन्हा कट रचण्यात आला. त्यात मुख्य सूत्रधार बाळ बोठे सह इतर आरोपींबरोबर टम्या पवार सहभागी होता, हे सिद्ध होते. कारण 24 नोव्हेंबर रोजी करण्यात आलेला कट यशस्वी झाला असता तर 30 नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची हत्या करण्याची वेळ आरोपींवर आली नसती, ही बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
30 नोव्हेंबर रोजी झालेल्या रेखा जरे हत्याप्रकरणात आरोपी पवारचा सहभाग स्पष्ट होत असल्याने टम्या पवारचा जामीन मंजूर करू नये अशी मागणी सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील व फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी न्यायालयात केली. आरोपींच्या वतीने बाजू मांडताना त्याच्या वकिलांनी आरोपी टम्या पवाराचे इतर आरोपींबरोबर 24 नोव्हेंबर रोजी मोबाईलवर बोलणे झाले. मात्र त्यानंतर रेखा जरे यांची हत्या झाली त्या दिवसापर्यंत (30 नोव्हेंबर) इतर आरोपींबरोबर टम्या पवारचे एकदाही बोलणे झालेले नाही. आरोपी टम्या पवारचा या हत्याकांडाशी काहीही संबंध नाही. खोटी हकीकत रचून टम्या पवारला हत्याकांडात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद आरोपी टम्या पवारच्या वकिलांनी न्यायालयात केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी आरोपी टम्या पवारचा जामीन अर्ज फेटाळला.

आज अटकपूर्ववर निर्णय
जरे हत्याकांडातील आरोपी बोठे याला हैदराबादमध्ये मदत करणारी वकील पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली असून, न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आहे. या अर्जावर शुक्रवारी (2 जुलै) निकाल दिला जाणार आहे.

COMMENTS