भाजपमय जिल्ह्याला…नऊ आमदारांची आडकाठी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपमय जिल्ह्याला…नऊ आमदारांची आडकाठी

विखेंसमोर आव्हान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागणार आधी कस

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील नव्या शिंदेशाही-भाजप सरकारमधील नगर जिल्ह्याचे एकमेव मंत्री राधाकृष्ण विखेंसमोर आता जिल्हा भाजपमय करण्याचे आव्हान आहे. प

वर्षावासानिमित्त प्रबोधन कार्यक्रमाला सुरूवात
कॉ. कातोरेंवरील हल्ल्याच्या प्रतिकाराबद्दल माकपच्या कार्यकर्त्यांचे कौतुक : डॉ. अशोक ढवळे
शिंदेशाहीचे नवे राज्य, मात्र राज्यकर्ते जुनेच

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यातील नव्या शिंदेशाही-भाजप सरकारमधील नगर जिल्ह्याचे एकमेव मंत्री राधाकृष्ण विखेंसमोर आता जिल्हा भाजपमय करण्याचे आव्हान आहे. पण त्यांच्या या उद्दिष्टासमोर राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसचे दोन व शिवसेना-अपक्ष एक आमदार यांची आडकाठी असणार आहे. अर्थात हा अडीच वर्षांनंतरचा विषय आहे. पण आता लगेच एक-दोन महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यातील 25 निवडणुकांतून विखेंना भाजपचा झेंडा जिल्हाभर फडकावा लागणार आहे. अडीच वर्षांपूर्वी जिल्ह्यातील ज्या आठ विधानसभा मतदारसंघांतील भाजप-शिवसेनेच्या युतीला पराभव पाहावा लागला, त्या पराभवांचे खापर त्यावेळी विखे पिता-पुत्रांवर फोडले गेले. या आठ जागांपैकी अकोले, कर्जत-जामखेड, राहुरी व कोपरगाव या भाजपच्या चार जागांवर राष्ट्रवादी, नेवाशाच्या भाजपच्या जागेवर अपक्ष-शिवसेना आणि पारनेर व नगर शहर या शिवसेनेच्या जागेवर राष्ट्रवादी आणि श्रीरामपूरच्या शिवसेनेच्या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला. त्यामुळे आताच्या स्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 6, काँग्रेसचे दोन, भाजपचे तीन व शिवसेना-अपक्ष एक असे 12 आमदार आहेत.

तो दावा ठरला फोल
2019 मध्ये दक्षिण नगर जिल्ह्याची भाजपची खासदारकी चिरंजीव डॉ. सुजय विखेंना मिळवून दिल्यावर व उत्तर नगर जिल्ह्याची म्हणजे शिर्डीची खासदारकी शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंना मिळवून दिल्यावर त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत विखे पिता-पुत्रांनी जिल्ह्यात 12-0 असा विजय मिळवण्याचा दावा केला होता. पण राष्ट्रवादी व काँग्रेसने जोरदार दणका असा दिला की, एकवेळ विखेंची राहात्याची जागा वगळता बाकी सर्व ठिकाणी पराभव होऊन 0-11 अशी भाजप-शिवसेनेची स्थिती होते काय, अशी वेळ आली होती. पण नंतर पाथर्डी-शेवगाव आणि श्रीगोंद्याच्या दोन जागा कशाबशा भाजपने जिंकल्या. याच पार्श्‍वभूमीवर आता अडीच वर्षांनी ज्या जागा पाडल्या, असे आरोप झाले, त्या 8 जागा भाजप-शिंदेशाहीला जिंकून देण्याचे आव्हान विखेंना पेलावे लागणार आहे व त्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावे लागणार आहे. अर्थात या आठ जागांवर जे आमदार सध्या कार्यरत आहेत, त्यांनाच जर भाजपमध्ये ओढले वा त्यांच्यामागे चौकशांचे शुक्लकाष्ठ लावले तर गमावलेल्या आठ जागांपैकी किमान सहा-सात जागा तर नक्कीच भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

झेड़पी-पंचायत समित्यात लागणार कस
येत्या एक-दोन महिन्यात जिल्हा परिषदेसह 14 पंचायत समित्या तसेच संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव, जामखेड या नगरपालिका व नेवासे नगरपंचायत अशा 25 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या जिंकून तेथे भाजप-शिंदेशाहीचा झेंडा फडकावा लागणार आहे. यात शिर्डी, राहाता, पाथर्डी, शेवगाव व श्रीगोंदे या तालुक्यात पक्षाचे आमदार असल्याने तेथे फारसे कष्ट पडणार नाहीत. मात्र, राष्ट्रवादी-काँग्रेस व शिवसेनेचे आमदार असलेल्या 9 ठिकाणी ताकद पणाला लावावी लागणार आहे. अर्थात या तालुक्यांच्या ठिकाणी पक्षाच्या माजी आमदारांचीही ताकद विखेंना मिळणार असली तरी त्यांच्यामध्ये आधी स्वतःबद्दलची विश्‍वासार्हता निर्माण करावी लागणार आहे व त्यातच खरा कस लागणार आहे.

विकास आघाडी गुंडाळावी लागेल
जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकांतून स्थानिक स्तरावरील सर्वपक्षीय नाराजांना एकत्र करून तालुका विकास आघाडीच्या रुपाने नवा पर्याय उभा करण्याचे खा. डॉ. सुजय विखे यांनी मध्यंतरी जाहीर केले होते. पण आता तालुका विकास आघाडीचे नियोजन बासनात गुंडाळून ठेवून ओन्ली भाजप-शिंदेशाही एवढाच विचार विखे पिता-पुत्रांना करावा लागणार आहे. पक्षाचाच झेंडा महत्त्वाचा असल्याचे भाजपच्या पक्षश्रेष्ठींचेच धोरण असल्याने तेच स्थानिक संस्थांच्या निवडणुकांतून विखेंना पुढे न्यावे लागणार आहे. त्यामुळे अन्य पक्षीय नाराजांना तालुका विकास आघाडीच्या नव्हे तर भाजप-शिंदेशाहीच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे कसब दाखवावे लागणार आहे.

COMMENTS