शिक्षक बँकेची पोटनियम दुरुस्ती वादाच्या भोवर्‍यात ; विरोधकांकडून आक्षेप, ऑनलाईन वार्षिक सभा गाजण्याची चिन्हे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षक बँकेची पोटनियम दुरुस्ती वादाच्या भोवर्‍यात ; विरोधकांकडून आक्षेप, ऑनलाईन वार्षिक सभा गाजण्याची चिन्हे

नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने आपले कार्यक्षेत्र राज्यभर करण्याचे ठरवले असून, त्यासाठी पोटनियम दुरुस्ती करण्याची तयारी सुरू केली आहे.

विद्यार्थ्यांनी अगस्ती शिक्षण संस्थेचे नाव मोठे करावे ः नाईकवाडी
निवडणूक विभागामार्फत ’अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचे आयोजन
कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे 50 दिवसानंतर आंदोलन मागे

अहमदनगर- नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने आपले कार्यक्षेत्र राज्यभर करण्याचे ठरवले असून, त्यासाठी पोटनियम दुरुस्ती करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, या दुरुस्तीला सत्ताधारी गुरूमाऊली मंडळातील सात संचालकांनी विरोध केला आहे व त्याचबरोबर गुरुकुल मंडळाचे प्रमुख डॉ. संजय कळमकर व रा. या औटी तसेच शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे, शिक्षक परिषदेचे प्रवीण ठुबे व संजय शिंदे, इब्टाचे राज्य उपाध्यक्ष आबा लोंढे, सदिच्छा मंड़ळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत, एकल शिक्षक मंचचे एल. पी. नरसाळे, पदवीधर शिक्षक संघाचे रघुनाथ झावरे आदी विरोधकांनीही विरोध केला आहे. यामुळे 28 मार्चला सकाळी साडेदहा वाजता होणारी शिक्षक बँकेची ऑनलाईन वार्षिक सभा गाजण्याची चिन्हे आहेत. 

सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाची मुदत संपल्याने त्यांनी बँकेबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत व बँकेवर प्रशासक नियुक्ती करावी, अशी मागणी विरोधकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाने दीड कोटीचा भ्रष्टाचार केला असून, शताब्दी वर्षानिमित्तच्या घड्याळ खरेदीची चौकशी सुरू असल्याने त्यावर वार्षिक सभेत चर्चा होऊ नये म्हणून पोटनियम दुरुस्तीचा विषय पुढे आणल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

घड्याळ खरेदीला परवानगीच नाही : शिंदे

बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाने सभासदांना भेट देण्यासाठी केलेल्या घड्याळ खरेदीला जिल्हा उपनिबंधकांची परवानगीच नाही, असा दावा शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी केला आहे. शिक्षक बँकेच्या सभासदांच्या कर्जाचे हप्ते जिल्हा परिषदेमार्फत कापून बँकेत जमा होत असतात व त्यालाही जिल्हा परिषदेकडून अडचणी येतात. अशा स्थितीत राज्यात बँकेचे कार्यक्षेत्र झाल्यावर तेथील शिक्षकांच्या कर्जाच्या वसुलीचे काय, हे सत्ताधार्‍यांनी स्पष्ट केलेले नाही. तुघलकी निर्णय पोटनियम दुरुस्तीत घेतले जात आहेत. बँकेचा स्टाफिंग पॅटर्न 165वरून 115 झाला असताना अन्य जिल्ह्यातील शाखांतून नवे कर्मचारी कसे भरणार, असा सवाल करून ते म्हणाले. विविध जिल्ह्यात बँकेसाठी जागा खरेदी व कर्मचारी भरतीतून आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने राज्य कार्यक्षेत्र पोटनियम दुरुस्ती विषय पुढे आणला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी उपस्थित असलेले आबासाहेब जगताप, किसन बोरुडे, एकनाथ व्यवहारे, अप्पासाहेब बेरड, बाळासाहेब देंडगे, विशाल खरमाळे, सतीश चाबुकस्वार, प्रवीण शेरकर, रहेमान शेख आदींनीही विविध आरोप सत्ताधार्‍यांवर केले. दीड कोटी लुबाडल्याचे झाकण्यासाठी पोटनियम दुरुस्ती पुढे आणली, मागच्या वर्षीचा लाभांश दिला नाही, अन्य बँका ठेवी गोळा करीत असताना शिक्षक बँक सत्ताधारी सभासद ठेवींच्या 1900 रुपये रकमेपैकी 900 रुपये परत करीत आहेत, सत्ताधा़री संचालक मंडळाने वर्षाच्या 365 दिवसात 661 सभा कशा घेतल्या, प्रत्येक चेअरमन बदलला की स्टेशनरी खर्च कसा वाढतो, सत्ताधार्‍यांच्या फक्त 150 महिलांना नारीशक्ती पुरस्कार देऊन त्यावर तब्बल 9 लाखावर खर्च केला गेला, असे विविध आरोप या सर्वांनी केले. पोटनियम दुरुस्ती झाली तर तिला न्यायालयात आव्हान देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, गुरुकुल मंडळाचे रा. या. औटी व संजय धामणे आमच्यासमवेत असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

86 लाखाचा तर उघड घोटाळा : डॉ. कळमकर

सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाने शताब्दी वर्ष घड्याळ खरेदीत 35 लाख रुपये तसेच बँकेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर त्याच्या फरकाची रक्कम देताना त्यातून निम्मी म्हणजे 51 लाखाची रक्कम घेतली असून, हा 86 लाखाचा घोटाळा तर उघड आहे, असा दावा गुरुकुल मंडळाचे प्रमुख डॉ. संजय कळमकर व रा. या. औटी यांनी केला आहे. या दोघांसह संजय नळे, सीताराम सावंत, सुदर्शन शिंदे, किरण दहातोंडे, अण्णा आंधळे आदींनी पत्रकारांशी बोलताना सत्ताधारी गुरुमाऊलीने भ्रष्टाचार केला असून, तो अजूनही सुरू आहे. मात्र, विकास मंडळानेही केलेले घोटाळे झाकण्याचा प्रयत्न होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेसाठी 15 लाख रुपये खर्च करण्यात आले तसेच सेवकांना दोन लाखाचा बोनस देण्याबरोबर भत्त्यापोटी 77 हजार रुपये लाटले आहेत, जुनी इमारत पाडल्यावर विकलेल्या रॉ-मटेरियलचा अहवालात कोठेही उल्लेख नाही, विकास मंडळ इमारतीचे काम अजूनही अपूर्ण आहे, अशी टीकाही यावेळी डॉ. कळमकर व औटी यांनी केली. बँकेतील सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाची मुदत संपली आहे, त्यामुळे त्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊ नये, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. सत्ताधार्‍यांनी 28च्या वार्षिक सभेत पोटनियम दुरुस्तीचा विषय मंजूर केला तर जिल्ह्यातील 9 हजारावर सभासदांच्या सह्यांचे निवेदन जिल्हा उपनिबंधकांना देऊन या पोटनियम दुरुस्तीला विरोध करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सत्ताधार्‍यांची मुदत संपली तरी श्रीगोंदे शाखेच्या नूतनीकरणासाठी 17 लाख रुपये मंजुरीचा ठराव घेण्यात आला आहे. या शाखेत गुरुमाऊली मंडळाच्या दोन्ही गटाचे संचालक आहेत. त्यातील एकानेही या खर्चाला आक्षेप नोंदवलेला नाही, असा दावा यावेळी करण्यात आले. बँकेचे सॉफ्टवेअर सदोष असून, सभासदांच्या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारले जाते, त्यामुळे हे सॉफ्टवेअर बदलण्याची मागणीही अजून सत्ताधार्‍यांनी पूर्ण केलेली नाही, अशीही टीका यावेळी करण्यात आली.

COMMENTS