अहमदनगर : लोकसेवा हक्क कायदा हा लोकांना तत्पर शासकीय सेवा देण्यासाठीचा कायदा असून लोकांची शासकीय कामे वेळेत पूर्ण व्हावी, या हेतुने हा कायदा अंमल
अहमदनगर : लोकसेवा हक्क कायदा हा लोकांना तत्पर शासकीय सेवा देण्यासाठीचा कायदा असून लोकांची शासकीय कामे वेळेत पूर्ण व्हावी, या हेतुने हा कायदा अंमलात आला असून जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभाग आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले. राज्य लोकसेवा हक्क अधिनिय 2015 च्या अंमलबजावणीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी आयुक्त कुलकर्णी बोलत होत्या.
या बैठकीला महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. आयुक्त चित्रा कुलकर्णी यावेळी म्हणाल्या, लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना नाशिक विभाग सर्वात उत्तम काम करणारा विभाग म्हणून नावलौकीक मिळविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शासकीय विभागांची प्रतिमा अधिकाधिक सुधारण्यासाठी हा कायदा उपयुक्त असून लोकांना विना तक्रारी, उत्तम सेवा देऊन अधिक गतिमान पध्दतीने कामकाज केल्यास कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कायदा नागरिकांसाठी खूप उपयुक्त असून दैनंदिन कामात नेहमी लागणारे सरकारी कागदपत्रे नागरिकांना सेवा हक्क कायद्यामुळे ऑनलाईन पध्दतीने मिळु शकतात यामुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक बचत होते. हा कायदा नवीन असून नागरीकांपर्यंत कायद्याचा हेतू पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना, जनजागृती शासकीय यंत्रणांनी करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत महसुल विभागाच्या सर्वाधिक सेवांचा समावेश होतो. या कायद्यात एकुण 506 सेवांचा समावेश असून 409 सेवा ऑनलाईन व 97 सेवा ऑफलाईन आहेत. अहमदनगर जिल्ह्यात एकुण 1343 ईसेवा, महाईसेवा केंद्र असून शहरी भागात 576 ग्रामीण भागात 770 केंद्र आहेत. या आढावा बैठकीत विभाग प्रमुखांनी कायद्याच्या कामकाजाबाबत आपल्या विभागांची माहिती सादर केली. या माहितीच्या अनुषंगाने कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे जिल्ह्यातील विविध विभागांचा कामकाजाच्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले.
COMMENTS