मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
अमरावती, मुंबई/प्रतिनिधी : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी दीपाली यांनी एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले. दरम्यान, शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली. दीपाली यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिली आहे. यात वरिष्ठ अधिकारी जिल्हा वनाधिकारी विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विनोद शिवकुमार यांच्यावर धारणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनविभागाचे प्रधान सचिव दर्जाचे दोन अधिकारी व्ही. साईप्रकाश आणि नितीन काकोडकर हे अमरावतीत दाखल झाले आहेत. त्याचबरोबर फॉरेस्ट रेंजर असोसिएशनचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने अमरावतीत दाखल झाले आहेत. दीपाली यांनी आपण गरोदर असताना आपल्याला कसे खड्ड्यातून आणि चिखलातून जायला भाग पाडले, आपल्याला शिवकुमार कसा त्रास देत होते, कशी मानहानी करीत होते, शिवीगाळ करीत होते, याचा उल्लेख सुसाईन नोटमध्ये केला आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर आता भाजप नेत्यांनी राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. भ्रष्ट व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला, असा हल्लाबोल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला. वाघ यांनी शुक्रवारी ट्वीट करून यासंदर्भात भाष्य केले. लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्या हरीसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हिचा भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला. विविध पद्धतीने तिला त्रास देण्यात आला. शिवकुमार याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा ही प्रयत्न केला, तिला अपमानित केल जात होते, असे वाघ यांनी म्हटले आहे.
दीपालीचा जीव वाचला असता..
खासदार नवनीत राणा यांनी दीपाली चव्हाण यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले नसते, तर तिच्यासारख्या कार्यक्षम अधिकार्याचा जीव वाचला असता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केले. चव्हाण यांनी स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे दाद मागितली होती, तेव्हा खासदारांनी आवाज उठवायला हवा होता. कदाचित वेळीच आवाज उठवला असता तर एक कार्यक्षम अधिकार्याचा जीव आपण वाचवू शकलो असतो, असे चाकणकर यांनी म्हटले.
COMMENTS