तुका म्हणे ऐसे मैंद, तयापाशी नाही गोविंद !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

तुका म्हणे ऐसे मैंद, तयापाशी नाही गोविंद !

तिर्थी धोंडा पाणी,देव रोकडा सज्जनी|| समाजव्यवस्था माणसाला माणूस म्हणून नाकारणारी असताना, संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी आपल्या अभंग आणि

 एसएससी बोर्डाच्या परीक्षेला आजपासुन सुरुवात
तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी
माशाचा तुकडा न वाढल्यानं लग्नात मारामारी; 11 जखमी

तिर्थी धोंडा पाणी,
देव रोकडा सज्जनी||

समाजव्यवस्था माणसाला माणूस म्हणून नाकारणारी असताना, संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या संतांनी आपल्या अभंग आणि गाथेतून, अशा अवैज्ञानिक आणि सामान्य जनांना लुटणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करायला शिकवले. विचारांना नाकारून देव्हारा बसवणाऱ्यांना संत तुकाराम महाराज यांनी खडेबोल सुनावले.

 ते म्हणतात..

जाऊनिया तिर्था काय तुवा केले,
चर्म प्रक्षाळीले वरी वरी

संत तुकाराम महाराज रोकडा सवाल विचारतात की, तिर्थयात्रेला जाऊन तू काय साध्य केलेस? शरीराला वरवर धूत बसला. परंतु, तुझे अंतर्मन कुठे स्वच्छ केले? तुझे मनच निर्मळ नसेल तर साबण काय करिल अशी विचारणाही ते याच अभंगात करतात.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, अतिशय विद्रोही आणि क्रांतिकारी अभंग रचून विषम आणि कर्मकांडी समाज रचनेच्या विरोधात उभे ठाकलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या विचारांना सोडचिठ्ठी देण्यासाठी आज देहू येथे त्यांची स्थापना देवालयात करण्यासाठी शीलान्यास केला गेला. या कार्यक्रमासाठी खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निमंत्रित करावे लागले. ज्या व्यवस्थेच्या विरोधात संत तुकाराम महाराज यांनी आजन्म लढा दिला, त्याच व्यवस्थेने आज त्यांना देव्हाऱ्यात बंदिस्त केले. निर्वाण पावलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या विज्ञानवादी आणि समाजव्यवस्थेविरोधात बंड करण्यास प्रवृत्त करणाऱ्या अभंग रचना, त्यांच्या जिवंतपणीच इंद्रायणीत बुडविण्यात आल्या होत्या. परंतु, संत तुकाराम महाराज यांच्या क्रांतिकारी अभंग रचनांना त्यांच्या वैचारिक अनुयायांनी विसाव्या – एकविसाव्या शतकात शोधून काढले. त्यावर “विद्रोही तुकाराम” डॉ. आ. ह. साळुंखे यांनी महाराष्ट्राला समजाऊन सांगितला. यातून हेदेखील सिध्द झाले की, जिवंतपणी ज्या संताच्या गाथा पाण्यात बुडविल्या तोच संत त्याच्या महानिर्वाणानंतर अधिक धोकादायक असल्याचे विषमतावादी व्यवस्थेच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शक्य तितक्या लवकर संत तुकाराम महारांजांचे देवालय बनविण्याचा आराखडा तयार करून त्यास आज देहू मुक्कामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंमलात आणण्याचा शिलान्यासही उरकला. ज्या संत तुकाराम महाराज यांनी

मेळवूनी नरनारी
शकुन सांगते नानापरी
तुका म्हणे ऐसे मैंद,
तयापाशी नाही गोविंद

या रचनेतून संत तुकाराम महाराज एका लूट करणारी आणि अवैज्ञानिक संस्कृतीच्या दंभावर घाव घालतात. त्यांच्या मते स्त्री-पुरूषांना गोळा करून त्यांचे भविष्य, पंचांग सांगणारे हे थोतांड करून लोकांची आर्थिक लूट करतात; त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा, असा सल्लाही ते देतात. अशा लोकांकडे कोणताही देव नसतो, असे ते आपल्या बंडखोर शब्दात सांगतात.‌ परंतु, आज त्याच संत तुकाराम महाराज यांचे देवालय उभारण्याचा शिलान्यास करून, त्याच्या पायात महाराजांचे विचार गाडून टाकले! महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पंच्च्याऐंशी टक्के समुहाच्या विचारांविरोधात ही कृती जेव्हा जाहीरपणे झाली, तेव्हा वैकुंठात असणाऱ्या महाराजांची मनस्थिती काय झाली असेल, असा प्रश्न विचार विसरणाऱ्यांनी आपल्या मनाशी एकदा जरूर विचार करावा!
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमित त्यांच्या विद्रोही विचारांचा वारसा अव्याहतपणे सुरू आहे, हे नाकारता येत नाही. मात्र, विचार मांडणाऱ्यांना जेव्हा बंदिस्त केले जाते तेव्हा त्यांच्या विचारांचा बळी दिला जातो, हे ऐतिहासिक सत्य आहे. या सत्याचे आवाहन पेलणे हे येणाऱ्या काळाचे आव्हान आहे!

COMMENTS