देशात दुसर्या कोरोना लाटेची जोरदार चर्चा आहे; परंतु ती केवळ महाराष्ट्रापुरतीच.
मुंबई/प्रतिनिधीः देशात दुसर्या कोरोना लाटेची जोरदार चर्चा आहे; परंतु ती केवळ महाराष्ट्रापुरतीच. त्याचे कारण देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण 59 टक्के आहे. देशातील 94 कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची दररोजची सरासरी 11 हजार आहे, तर महाराष्ट्रात ती 18 हजार आहे. आगामी दोन महिने कोरोनााबधितांची संख्या अशीच वाढण्याचा धोका असून संपूर्ण महाराष्ट्रच व्हेंटिलेटरवर जाण्याची भीती आहे.
24 मार्चला येथे महाराष्ट्रात सुमारे 32 हजार नवे रुग्ण आढळले. या तुलनेत सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दहा राज्यांत एकूण 11 हजार रुग्ण आढळले. एक मार्चपासून आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरी 17 हजार 838 रुग्ण आढळत असून गेल्या दोन आठवड्यांत ही संख्या 30 हजारांवर गेली आहे. दुसरीकडे, या दरम्यान दहा मोठ्या राज्यांत एकूण सरासरी 5420 नवे रुग्ण आढळत आहेत. मोठ्या लोकसंख्येच्या राज्यात कर्नाटकचाही समावेश आहे. येथे रोज सरासरी एक हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्राहून सुमारे दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात रोज सरासरी 310 रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जेथे कोरोनाचे तिन्ही स्ट्रेन सापडले आहेत. यात ब्रिटनच्या स्ट्रेनचे 56, दक्षिण आफ्रिकी स्ट्रेनचे पाच आणि ब्राझील स्ट्रेनचा एक रुग्ण आहे. नवा डबल म्युटंट प्रकारही येथे सापडला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी जाहीर केलेल्या एका अहवालात दावा केला आहे, की भारतात फेब्रुवारीपासून कोरोनाचे नवे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हा कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेचा स्पष्ट इशारा आहे. ही वाढ 15 फेब्रुवारीपासून सुरू झाली असे गृहित धरले तर दुसरी लाट किमान 100 दिवस राहू शकते. पहिल्या लाटेदरम्यानचा अनुभव पाहता या वेळी एप्रिलच्या मध्यापर्यंत नव्या रुग्णांचा उच्चांक होऊ शकतो. तर, 23 मार्चला आढळलेल्या नव्या रुग्णांच्या आधारे दुसर्या लाटेत एकूण 25 लाख रुग्ण आढळतील. विविध जिल्ह्यांत लागू केले जात असलेली टाळेबंदीही कोरोना रुग्ण कमी करण्याच्या कामी कुचकामी ठरत आहे. जास्तीत जास्त लसीकरण हीच आता आशा आहे. या लॉकडाऊनचा व्यवसायावरील परिणाम पुढील महिन्यांत दिसू शकतो.
आगामी दोन महिने जोखमीचे
कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे हा एकमेव मार्ग आहे. जर आत्तापासून गणना केली गेली तर ते एप्रिलच्या दुसर्या पंधरवड्यापासून ते मेच्या मध्यापर्यंत कोरोना उच्चस्तरावर जाऊ शकतो. यापूर्वी मागील वर्षी सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात कोरोना देशात उच्चस्तरावर होता. त्या वेळी दररोज 90 हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत होती. राज्यांमधील लसीकरण प्रक्रियेस वेग देण्याची गरज असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत, लसीकरणाचा वेग दररोज 34 लाखांवरून 40-45 लाख पर्यंत वाढवला गेला तर 3 ते 4 महिन्यांत 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना संपूर्ण लसीकरण करता येईल.
अधिकाधिक चाचण्यांची गरज
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील 18 राज्यात कोरोनाचा डबल म्युटेंट व्हेरिएंट सापडला आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले, की कोरोनाची दुसरी लाट वेळेपूर्वीच आली आहे. म्हणूनच आपण सर्वांनी जागरूक राहण्याची गरज आहे. अधिकाधिक चाचण्या केल्या जाव्यात, मुखपट्टी लावणे आवश्यक आहे. तसेच, लसीकरण लवकरात लवकर पूर्ण केले पाहिजे.
COMMENTS