पुणे/प्रतिनिधी : पुण्यात ओमायक्रॉनच्या विषाणूचे बीए 4, बीए 5 या व्हेरियंटचे 7 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून, राज्य सरकार लवकरच को
पुणे/प्रतिनिधी : पुण्यात ओमायक्रॉनच्या विषाणूचे बीए 4, बीए 5 या व्हेरियंटचे 7 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले असून, राज्य सरकार लवकरच कोरोना चाचण्यात वाढ करणार असल्याचे सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
मुंबईत अचानकपणे 500 नवीन रुग्ण आढळून आले. क्लस्टर भाग असणार्या ठाणे, पुणे, पालघर या ठिकाणी देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याला काही उपाययोजना कराव्या लागणार असून आज ज्या 30 ते 40 हजार चाचण्या आम्ही करत आहोत त्यात ही वाढ करावी लागणार आहे. क्लस्टर जिल्ह्यांना त्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. काळजी करण्याचं, घाबरण्याचं सध्या काही कारण नाही, पण काळजी घ्यावी लागेल. सात रुग्णांपैकी 4 रुग्ण पुरुष आणि 3 महिला आहे. 5 रुग्णांचं वय 50 पेक्षा जास्त आहे. 2 रुग्ण 20 ते 40 वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 10 वर्षांपेक्षा लहान वयाचा आहे. याआधी भारतात हैदराबाद या व्हेरिएंटचा देशातील पहिला रुग्ण सापडला होता. हा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या मोठ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. हा संसर्ग आणि लसीकरणामुळे मिळालेल्या रोगप्रतिकारक क्षमतेलाही प्रभावित करण्यासाठी सक्षम असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत ’कप्पा’, ’डेल्टा’सारखे नवे विषाणू प्रकार शोधण्यात पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचा मोठा वाटा आहे. देशभरातील प्रयोगशाळांचे समन्वय करण्याची भूमिका सध्या बीजे मेडिकल कॉलेजकडे आहे. त्यांच्या माध्यमातून पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून पुण्यात मे महिन्यात आढळलेल्या रुग्णांचे बीजे मेडिकलच्या माध्यमातून ’आयसर’च्या प्रयोगशाळेने जिनोम सिक्वेन्सिंग केले. त्यातून ओमायक्रॉनचा नवा विषाणू प्रकार शोधण्यात यश आले. या संदर्भात बी. जे. मेडिकल कॉलेजच्या सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, ’यापूर्वी आम्ही दुसर्या लाटेत करोनाच्या विषाणूचे म्युटेशन शोधून काढले. जगभरात त्याच विषाणूचा संसर्ग वाढल्यानंतर त्या विषाणूला कप्पा, डेल्टा ही नावे देण्यात आली. आता बीए 4 आणि बीए 5 हे विषाणू बाहेरच्या देशात धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे फुफ्फुसाला संसर्ग होत आहे; परंतु भारतीयांमध्ये दोन्ही लाटांमध्ये झालेला संसर्ग, लसीकरणामुळे तयार झालेली सामूहिक रोगप्रतिकारशक्ती यामुळे नव्या विषाणूच्या संसर्गानंतरही सध्या तरी फारसा धोका नाही.
समूहसंसर्ग नसला, तरी सतर्क राहण्याची गरज
ओमायक्रानच्या नव्या व्हेरियंटचे सात रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर खळबळ उडाली असली, तरी हा समूहसंसर्ग नाही. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नसले तरी सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे. ओमायक्रॉनचा नव्या प्रकाराचा विषाणू गेल्या महिनाभरापासून पुण्यात असल्याने ’कम्युनिटी स्प्रेडिंग’ व्हायला हवे होते. मात्र, त्याचा वेग पाहता अद्याप त्याचा समूहसंसर्ग झाला नाही. त्यामुळे फारसे रुग्ण आढळले नाहीत. मात्र, या विषाणूमुळे बाधित झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते का; तसेच त्यांना अतिदक्षता विभाग किंवा ऑक्सिजनची गरज आहे का, याचे निरीक्षण करावे लागणार आहे, याकडे लक्ष वेधताना ’पॅनिक’ होऊ नका, असाही सल्ला डॉ. कार्यकर्ते यांनी दिला आहे.
COMMENTS