शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीला जर आपल्या हक्काचे पाणी मिळाले तर या परिसरातल्या तरुणांना हमाली करण्यासाठी मुंबईला
शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतीला जर आपल्या हक्काचे पाणी मिळाले तर या परिसरातल्या तरुणांना हमाली करण्यासाठी मुंबईला जावे लागणार नाही. या परिसरातला तरुण जर नोकरीसाठी कुठे बाहेर गेला तर तो डॉक्टर किंवा प्राध्यापक म्हणून जाईल. मात्र, त्यासाठी इथल्या पाणी प्रश्नावर आपण सगळ्यांनी एकजुटीने संघर्ष केला पाहिजे. त्याच अनुषंगाने जूनच्या मध्यावर या परिसरामध्ये पाणी परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी चिंचेवाडी (ता. शिराळा) येथे आज झालेल्या बैठकीत केले.
शिराळा तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे दिवंगत पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मोहन मस्कर-पाटील यांनी चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबाबतीत मान्यवरांनी आपल्या भाषणात अनेक आठवणी जागविल्या. शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हनमंतराव पाटील, चैतन्य दळवी, वसंत पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती हणमंतराव पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य सदस्य वसंत पाटील, चैतन्य दळवी, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विष्णू पाटील, मानसिंग पाटील, आनंदराव पाटील, काळुंद्रे सरपंच विजय पाटील, सखाराम पाटील, शंकर पाटील या मान्यवरांसह परीसरातील सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार टि. जी. किनरे यांनी मानले.
COMMENTS